जालन्यात जोरदार पाऊस, कुंडलिका नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:56 AM2017-09-15T00:56:45+5:302017-09-15T00:56:45+5:30

जालना शहर व परिसरात गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

 Heavy rainfall in Jalna, flood to Kundalika river | जालन्यात जोरदार पाऊस, कुंडलिका नदीला पूर

जालन्यात जोरदार पाऊस, कुंडलिका नदीला पूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर व परिसरात गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधारा ओसंडून वाहिला तर सीना नदीलाही पूर आला होता. बदनापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.
गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास मुसळधार बरसला. त्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत संततधार सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला. टाऊन हॉल परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिमंदिर ते सरस्वती भुवन शाळेपर्यंत खोदलेला रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला. अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मामा चौक परिसरातीही नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. पहाटे झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाºयावरून पाणी वाहिले. तसेच कुडलिका नदीला पूर आला होता. परिणामी रोहणवाडी गावाला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती. दुपारी पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरणामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. अर्धा तास जोरदार बरसल्यानंतर जोर ओसरला. जालना तालुक्यातही बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, गुुरुवारी सकाळी प्र्राप्त आकडेवारीनुसार जालना तालुक्यात ११. ६३, बदनापूरमध्ये २७. ४०, भोकरदनमध्ये २.७५, अंबडमध्ये ३.५७, घनसावंगी २.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जाफराबाद, परतूर, मंठा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ५०९.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title:  Heavy rainfall in Jalna, flood to Kundalika river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.