जिल्हाभरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:05 AM2021-05-30T04:05:06+5:302021-05-30T04:05:06+5:30

औरंगाबाद : जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर वातावरणात उकाडा होता. तोच ...

Heavy rains across the district | जिल्हाभरात जोरदार पाऊस

जिल्हाभरात जोरदार पाऊस

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर वातावरणात उकाडा होता. तोच सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी उन्हाळी पिकांचे नुकसान झाले, तर काही भागांमध्ये घरावरील पत्रे उडाली. मात्र, मान्सूनपूर्व रोहिण्या बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप पेरणीच्या अनुषंगाने कामांना गती मिळणार आहे.

---

सोयगाव शहरात रोहिण्या बरसल्या

सोयगाव : शहरासह तालुकाभरात रोहिण्यांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल पंधरा मिनिट पाऊस झाला. त्यात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा शेतकऱ्यांना बसल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. सायंकाळी वातावरणात गारठा पसरला होता. मृगाच्या आधीच पहिलाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले. वेताळवाडी भागात वाऱ्याचा जोर अधिक होता. गलवाडा, आमखेडा परिसरातही रोहिण्यांचा पाऊस बरसला. घोसला गावात वादळी वाऱ्यामुळे पत्रेही उडाली. (फोटो)

---

फुलंब्री तालुक्यात एक तास पाऊस

फुलंब्री : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सर्वदूर एक तासभर जोरदार पाऊस पडला. या पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, खरीप पिकाच्या लागवडीसाठीही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर मशागतीच्या कामांना वेग मिळणार आहे. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिराही पाऊस पडण्याची चिन्हे वातावरणात दिसून येत होती. फुलंब्री शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. बसस्थानकनजीक सिमेंटचे रस्ते करण्यात आले; पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी जाण्याकरिता नाल्या केल्या गेल्या नाही. परिणामी रस्त्यावर पाण्याचे तळे साचलेले दिसून आले. हे दुकानदार व वाहनधारकांकरिता धोक्याची घंटा आहे. (फोटो)

---

लाडसावंगीत वादळी वारे

लाडसावंगी : परिसरात सलग दुसऱ्या दिवशी रोहणी नक्षत्राच्या वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी झाडे उळमळून पडली, तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली, तर घरासमोर ठेवलेले धान्य ओले झाल्याने अनेक कुटुंबीयांचे नुकसान झाले.

---

घाटनांद्रा परिसरात पावसाची हजेरी

घाटनांद्रा : परिसरात शनिवार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडासह, वादळी वाऱ्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळपासूनच वातावरण दमट झालेले होते. सायंकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली अन् क्षणार्धांत रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले. या भागातील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.

---

करंजखेड परिसरात पावसाच्या सरी

करंजखेड : परिसरात शनिवारी सांयकाळी एक तासभर जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शनिवारी दिवसभर वातावरण तापलेले होते. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. तोच सायंकाळी पावसाच्या सरीने धो-धो धुतले. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले. (फोटो)

---

केळगावात तासभर पाऊस

के‌ळगाव : परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे. तासभर पावसाने मिरची पिकाचे नुकसान केले. उन्हाळी पिकाचे नुकसान झाले असले तरी खरिपासाठी हा पाऊस दिलासादायक आहे. केळगाव, आधरवाडी, कोल्हाळा, तांडा या गावांनादेखील पावसाने झोडपले.

---

अजिंठ्याच्या डोंगरात वादळी वारे

घोसला : अजिंठ्याच्या डोंगराला शनिवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याने घेरले. तासभर डोंगरपरिसर दिसेनासा झाला होता. पायथ्याशी वसलेल्या गावांमध्येदेखील वादळी वाऱ्यासह तास-दीड तास झालेल्या पावसाने मोठा फटका बसला. जरंडी, निंबायती, कवली, निमखेडी, रामपुरा, बहुलखेडा, घोसला या गावांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

---

चिंचोली लिंबाजी परिसरात मुसळधार पाऊस

चिंचोली लिंबाजी : परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह रोहिणी नक्षत्राचा मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. नेवपूर, वाकी, तळनेर, टाकळी अंतूर, वडोद, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद या गावांमध्येदेखील जोरदार पाऊस झाला आहे. जवळपास तासभर पावसाने बॅटिंग केली.

--

पिरबावडा परिसरात वादळी वारे

पिरबावड़ा : परिसरात दिवसभर असलेल्या उकाड्याने नागरिकांच्या जिवाची लाहीलाही झाली होती. तोच सायंकाळी वादळी वाऱ्याने जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीकामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटाने परिसर निनादून गेला होता.

Web Title: Heavy rains across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.