पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

By विकास राऊत | Published: July 13, 2023 08:07 PM2023-07-13T20:07:24+5:302023-07-13T20:08:38+5:30

पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे.

Heavy rains, sowing only on 29 lakh hectares out of 51 in Marathwada | पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. मागील चार वर्षांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे. मुबलक पाऊस झाला नाहीतर कडधान्यांची पिके संकटात येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात खरीप हंगामात १७ विविध पिकांची पेरणी होते. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका तृणधान्यांचा, तूर, मूग, उडीद कडधान्यांचा, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफुल, सोयाबीन या गळीत धान्यांसह कापूस व उसाची पेरणी केली जाते.

पाऊस लांबल्यामुळे कडधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कापूस, मका, साेयाबीन पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला आहे. कापूस ६४ टक्के, सोयाबीन ७३ टक्के, मका पिकांची ६१ टक्के पेरणी झाली आहे. पेरण्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात विभागात सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. मागील चार वर्षे ओला दुष्काळ आणि यंदा समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. ४३ टक्के म्हणजेच २२ लाख हेक्टर क्षेत्र अजून पेरण्यांअभावी पडून आहे.

उसाचे क्षेत्र शून्य टक्क्यावर
खरीप हंगामात २ लाख ६५ हजार ८०९ हेक्टवर पेरणीचे क्षेत्र आहे. परंतु यंदा उसाची पेरणी शून्य टक्क्यावर आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झाली नसल्याचे दिसत असून याचा परिणाम येणाऱ्या गळीत हंगामावर होणे शक्य आहे.

कडधान्यांच्या पेरण्या कमी
कडधान्यांच्या पेरण्या कमी झाल्यामुळे डाळींचे उत्पादन घटू शकते. पुढील काळात डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हं यातून दिसत आहेत. ८ लाख ७ हजार हेक्टरपैकी फक्त २ लाख ७० हजार हेक्टरवर कडधान्यांच्या पेरण्या झाल्या असून पावसाअभावी ही पिकेही धोक्यात येत आहेत.

जिल्हानिहाय पेरण्या
औरंगाबाद- ७३ टक्के
लातूर- ५७ टक्के
उस्मानाबाद- ३६ टक्के
नांदेड- ५८ टक्के
परभणी- ६० टक्के
हिंगोली- ६१ टक्के
जालना- ५२ टक्के
बीड- ५७ टक्के
एकूण- ५७ टक्के
 

Web Title: Heavy rains, sowing only on 29 lakh hectares out of 51 in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.