वाळूज महानगरात पावसाची जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:04 AM2021-06-01T04:04:06+5:302021-06-01T04:04:06+5:30
वाळूजमहानगर परिसरात सोमवारी दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास या परिसरातील पंढरपूर, वाळूज, बजाजनगर, सिडकोवाळूज महानगर, ...
वाळूजमहानगर परिसरात सोमवारी दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास या परिसरातील पंढरपूर, वाळूज, बजाजनगर, सिडकोवाळूज महानगर, तीसगाव, वडगाव, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, आदी भागांत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिक व वाहनधारकांना पावसापासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. मुख्य रस्त्यांवर व नागरी वसाहतीत पाण्याचे तळे साचले होते. तब्बल तासभर पावसाने झोडपल्यानंतर परिसरात उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता.
वीज पुरवठा खंडित
वाळूज महानगर परिसरात सायंकाळी जोरदार पावसाचे आगमन झाल्यानंतर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी नागरिकांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले. महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्तीची कामे थातुर-मातुर पद्धतीने केल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याची ओरड नागरिकांतून केली जात आहे.