जोरदार पावसामुळे कणकोरीचा पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:05 AM2021-09-26T04:05:46+5:302021-09-26T04:05:46+5:30
तालुक्यातील खडक नारळा, गाजगाव, घोडेगाव भागात शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नारळी नदी ओसंडून वाहत असून, कणकोरी येथील पुलाचे ...
तालुक्यातील खडक नारळा, गाजगाव, घोडेगाव भागात शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नारळी नदी ओसंडून वाहत असून, कणकोरी येथील पुलाचे नुकसान झाले आहे. १९८५ ला उभारण्यात आलेला हा पूल पूर्ण खचल्याने कणकोरी गावातील नागरिकांना गंगापूरकडे जाणारा रस्ता शनिवारी दुपारपर्यंत बंद होता. मालुंजा व कोळघर येथील नागरिकांना वाळूज औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. कणकोरी येथील पूल खचल्याने कामगारांना लांबच्या मार्गावरून जावे लागले. सततच्या पावसाने या नदीवरील बंधारा वाहून गेल्याने शेतात पाणी शिरले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याने या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून पूल उभारण्यात यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
-------
नारळी नदीवरील ४० वर्षे जुना पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी सर्व राजकीय नेत्यांनी लक्ष घालून पूल बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्यास गावकऱ्यांचा कायमचा प्रश्न मार्गी लागेल. - रामदास पवार, ग्रा.पं. सदस्य, कणकोरी
250921\1722-img-20210925-wa0009.jpg
गंगापूर : तालुक्यातील कणकोरी येथील नारळी नदीवरील पूल वाहून गेल्याने हा पूल काहीकाळ बंद करण्यात आला होता