अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 07:04 PM2021-09-10T19:04:30+5:302021-09-10T19:11:02+5:30
Heavy Rain in Marathwada : पाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची शक्यता
औरंगाबाद : मराठवाड्यात ( Marathwada ) गुरूवारी पावसाने उघडीप दिली असली तरी ८०० मिलीमीटर पावसाची नोंद विभागात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२१ मिमी पाऊस अधिक झाला आहे ( Heavy Rain in Marathwada ). या पावसाने विभागात तांडव केले असून सुमारे ५ लाख हेक्टरच्या आसपास खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश महसूल खात्याने विभागीय पातळीवर दिले आहेत.
मराठवाड्यात चार दिवस पावसाने धुमाकूळ घातला. चार दिवसांत १०० मिमी हून अधिक पाऊस विभागात पडला. यामुळे अनेक ठिकाणच्या पिकांचे नुकसान झाले, शेतजमिनी वाहून गेल्या. तसेच गावांना जोडणारे छोटे पूल, रस्ते खचले. या सगळ्यांचा पंचनामा करण्यासाठी विभागीय प्रशासनाने आदेश दिले आहेत. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांत मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे भर पडली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विभागात १.२ मिमी पावसाची नोंद झाली. ११७ टक्के पाऊस आजवर नोंदविला गेला आहे. ६७९ मिमी या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८०० मिलीमीटर पाऊस आजवर झाला आहे.
हेही वाचा - पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?
जिल्हानिहाय पंचनामे करण्याचे आदेश
विभागीय महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले की, मराठवाड्यात गेल्या १ सप्टेंबर ते आजवर झालेल्या पावसामुळे किती नुकसान झाले आहे, जमीन किती वाहून गेली आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचे क्षेत्रफळ किती आहे. यासाठी वस्तुनिष्ठ सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हानिहाय दिले आहेत. चार ते पाच दिवसांत पाहणीचा अहवाल आल्यानंतर किती नुकसान झाले समोर येईल. सध्या समोर आलेली आकडेवारी ही वस्तुनिष्ठ नाही, त्यामुळे नेमके किती नुकसान झाले हे आत्ताच सांगता येणार नाही.
हेही वाचा - विकासकामे 'फास्ट ट्रॅक'वर; औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवेचा प्राधान्याने विचार