भारीच! जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी झाले ‘कोडिंग’मध्ये ‘मास्टर’
By राम शिनगारे | Published: February 8, 2024 05:37 PM2024-02-08T17:37:47+5:302024-02-08T17:38:02+5:30
जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्साहात : तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देत कोडिंगमध्ये मास्टर करण्यात आले आहे. हा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आला होता. त्यासाठी ६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवित कोडिंगचे प्रशिक्षण घेतले आहे.
शालेय शिक्षण विभागाने अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एनहान्स लर्निंग संस्थांच्या सहकार्याने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव नुकताच घेतला. त्यात जि. प., मनपाच्या शाळांमधील ग्रामीण, आदिवासी आणि शहरातील ६ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी ३ हजार विद्यार्थ्यांनी अनप्लग चॅलेंज (संगणकाशिवाय) सोडवले. या विद्यार्थ्यांपैकी अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची जिल्हास्तरावरील १० शाळांमधील ३० विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड केली. निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफाॅर्मवर कोडिंग करत त्यावर समस्यांवर उपाय शोधून कोडिंगच्या सहाय्याने गेम, ॲनिमेशन आणि ॲप्लिकेशन स्वरूपात प्रकल्प तयार केले. कोडिंग प्रकल्प तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्ये जसे की, चिकित्सक विचार, सहकार्य, संवाद कौशल्ये, समस्या निवारण यांचा वापर केला आहे. याविषयी इतरही प्रोग्राम बनविण्यात आले.
वैजापूरची शाळा प्रथम तर जि. प.ची द्वितीय
या उत्सवात वैजापूर येथील नगरपरिषदेच्या मौलाना आझाद विद्यालयाने प्रथम तर शिंदेफळ येथील जि. प.च्या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन शाळांतील तीन विद्यार्थी व एका शिक्षकाचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे. सहभागी दहा शाळांमधील पाच शाळांना ४३ इंची एलईडी टीव्ही, तर पाच शाळांना टॅब व रोख बक्षिसे देण्यात आली. यावेळी डाएटच्या प्राचार्या डॉ. वैशाली कांबळे, अधिव्याख्याता डॉ. उज्ज्वला करवंदे, डॉ. प्रमोद कुमावत, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. सोज्वल जैन, इरफान ललाणी यांची उपस्थिती होती.