जड वाहनांनी केला पुन्हा शहरात शिरकाव!
By Admin | Published: September 15, 2014 12:45 AM2014-09-15T00:45:48+5:302014-09-15T00:57:35+5:30
औरंगाबाद : रस्ते अपघातात एखाद्या सर्वसामान्य निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतर वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका साधी दखलही घेत नाहीत.
औरंगाबाद : रस्ते अपघातात एखाद्या सर्वसामान्य निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतर वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका साधी दखलही घेत नाहीत. यापुढे तरी अशा पद्धतीने अपघात घडू नयेत म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. उलट पोलिसांकडून वर्दळीच्या वेळेत जड वाहतुकीला शहरातून ये-जा करण्याची मुभा देण्यात येते. अवजड वाहनांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चालली आहे. जड वाहनांना विशिष्ट वेळ व मार्गांचे बंधन घालून दिलेले आहे. सकाळी व सायंकाळी या वाहनांना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी हर्सूल, शिवाजीनगर, शहानूरमियाँ दर्गा या मार्गांबरोबरच जालना रोडनेही धोकादायक वाहने शहरात राजरोसपणे प्रवेश करीत आहेत. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा व वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अशा वाहनांना सकाळ व सायंकाळच्या वेळेच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. शिवाय त्यांचे मार्ग कोणते असावेत यासंबंधीचे नियमही घालून देण्यात आले होते. या नियमांनुसार सकाळी ६ ते १ वाजेदरम्यान व सायंकाळी ४ ते ९ वाजेदरम्यान अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. या नियमांचे काही दिवस पालन करण्यात आले. महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरच त्यांना अडविण्यात आले होते. मात्र, थोड्याच दिवसांत कारवाई थंडावली व ही वाहने पुन्हा अवेळी शहरात येऊ लागली. शहरातील वाढती वाहनांची संख्या, बेशिस्त वाहतूकव्यवस्था हा गहण प्रश्न बनला आहे. शहरातील अरुंद रस्ते, बंद सिग्नल यामुळे नेहमीच ट्रॅफिक जाम असते. अशा परिस्थितीत अवजड वाहने अवैधपणे शहरात प्रवेश करून वाहतूक कोंडी तर करतातच शिवाय अपघातांनाही निमंत्रण देतात. ही वाहने दुचाकींना धडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशन ते हर्सूल, बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा, सिडको ते जळगाव टी-पॉइंट, असे काही प्रमुख रस्ते असून या रस्त्यावरून बस, कार, दुचाकी वाहनांची सतत वर्दळ असते; परंतु शहरातील सध्याचे चित्र बघितल्यास या रस्त्यांवरून सकाळ, संध्याकाळ अवजड वाहने भरधाव वेगाने धावताना दिसतात. शिवाय रस्त्याच्या कडेला ट्रक, कंटेनरसारखी वाहने सर्रासपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. वाहतूक नियंत्रक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या निर्दशनास हे चित्र येत असतानासुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, जड वाहनचालक आणि मालक बिनधास्त झाले आहेत.