औरंगाबाद जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; १ हजार टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 07:21 PM2019-04-26T19:21:18+5:302019-04-26T19:21:40+5:30
अप्पर मुख्य सचिवांकडून टँकरची पाहणी पाणीटंचाईसंबंधी उपाययोजनांबद्दल बैठक
औरंगाबाद : जिल्ह्यात वाढत्या तापमानाबरोबर दिवसेंदिवस पाणीटंचाई देखील भीषण होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी ९३४ टँकर सुरू होते. आज एक हजारापर्यंत टँकरचा आकडा पोहोचला आहे. दुसरीकडे, जलस्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. त्यामुळे मे आणि जून महिन्यातील काही दिवस टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या जलशुद्धीकरण केंद्रावरच अवलंबून आहे.
दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक घुगे, महापालिकेचे अधिकारी आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. टंचाईच्या काळात मे आणि जून महिन्यातील काही दिवसांमध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी सध्या ग्रामीण भागात सुमारे एक हजार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, १ मेपर्यंत महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून टँकर भरले जातील. शहरातील नागरिकांही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे १ मेनंतर त्या जलशुद्धीकरण केंद्रावरून टँकर भरले जाणार नाहीत. त्यामुळे १ मेपासून ‘डीएमआयसी’अंतर्गत खोडेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर टँकर भरले जातील, अशी माहिती दिली.
त्यानंतर अप्पर मुख्य सचिव गोयल व अधिकाऱ्यांचा ताफा शेंद्रा ‘एमआयडीसी’ जलशुद्धीकरण केंद्रावर गेला. सध्या शेंद्रा जलशुद्धीकरण केंद्र येथे टँकरसाठी ६ पॉइंट कार्यान्वित करण्यात आले आहेत. आणखी तेथे टँकर भरण्यासाठी पॉइंट वाढविले जाऊ शकतात का, याची माहिती जाणून घेतली. साजापूर ‘एमआयडीसी’ जलशुद्धीकरण केंद्र येथे पहिले दोन पॉइंट होते. त्याठिकाणी आणखी एक पॉइंट वाढविण्यात आला आहे. सध्या त्याठिकाणी ३ पॉइंटवरून टँकरला पाणीपुरवठा केला जात आहे. गोयल यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी गोयल यांनी सूचना दिल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कौर, पाणीपुरवठा विभागाचे अशोक घुगे, औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसोबत गोयल यांनी करमाड व लाडगाव येथे जाऊन टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पडताळणी केली. या दोन्ही गावांतील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक
एमआयडीसी, महावितरण, जलसंपदा आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पुढील आठवड्यात मंत्रालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीत टँकर भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना आखल्या जातील, असे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी औरंगाबादेतील बैठकीत सांगितले. ४सध्या मुधलवाडी जलशुद्धीकरण केंद्रात २, बजाजगेट जलशुद्धीकरण केंद्रात २, शेंद्रा एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रात ६, बीकेटी येथून २, साजापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात ३, बिडकीन जलशुद्धीकरण येथे १ आदी पॉइंटद्धारे टँकर भरले जातात. १ मेपासून खोडेगाव येथे टँकर भरण्यासाठी पॉइंट सुरू होईल. तेथे औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील गावांसाठी टँकर भरले जातील, तर शेंद्रा येथे फुलंब्री व जवळपासच्या गावांचे टँकर भरले जातील, असे प्रभारी कार्यकारी अभियंता घुगे यांनी सांगितले.