हेडगेवार रुग्णालयात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे संघाने घेतले बौद्धिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:18 AM2019-01-28T00:18:51+5:302019-01-28T00:19:05+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा सभागृहात रविवारी देवगिरी प्रांत समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा सभागृहात रविवारी देवगिरी प्रांत समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांचे बौद्धिक घेतले. जालन्यात सोमवारी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी संघ परिवाराचे पूर्ण कामकाज भाजपच्या मंत्र्यांना रविवारी सांगण्यात आले. त्याआधारेच सोमवारच्या कार्यकारिणीत भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे बौद्धिक घेतले जाणे शक्य आहे. शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो संघ परिवाराच्या ताकदीवर ज्या जागा आहेत, त्या पुन्हा मिळविणे तसेच युती तुटल्यास अधिकच्या जागांसाठी मोर्चेबांधणी कशी करता येईल, याची चाचपणी प्रांत समन्वय बैठकीतून करण्यात आल्याचे भाजप गोटातून समजले.
मुख्यमंत्र्यांसह मंत्री संघाच्या अशा बैठकींना आजवर वारंवार हजेरी लावत आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेसोबत भाजपची युती होणे धूसर होत चालल्याने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास संघासह परिवाराची भूमिका कशी असेल, हे जाणून घेण्यासाठीच मराठवाडा आणि खान्देश प्रांत समन्वय बैठकीला भाजप मंत्रिमंडळ आल्याची चर्चा सुरू झाली आहे. गाजावाजा न करता गुप्तरीत्या ही बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निवडणुकीच्या वातावरणामुळे संघाच्या अजेंड्यावर दुष्काळ उपाययोजना असून, संघ परिवारातील उपसंघटना मराठवाडा आणि खान्देशात काय काम करीत आहेत, याचा बैठकनिमित्ताने आढावा घेण्यात आला. शेवटच्या सत्रात दुष्काळ उपाययोजना आणि संघ परिवार या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, देवगिरी प्रांत संघचालक दाजी जाधव, पश्चिम क्षेत्र संघचालक बाळासाहेब चौधरी यांच्यासह भाजप आमदारांची उपस्थिती होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दिवसभर प्रांत समन्वय बैठक घेण्यात आली. ही बैठक दरवर्षी घेण्यात येते. रा.स्व.सं व संघ परिवारांतर्गत येणाºया मजदूर संघ, किसान संघ, स्त्रीशक्ती, विद्यार्थी संघ, संस्कार भारती व इतर संघप्रणीत संघटना काय करीत आहेत, त्यांचे काम कसे चालले आहे, हे दिवसभराच्या विविध सत्रांत एकमेकांना समजून सांगण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संघ व परिवार काय करू शकतो, टंचाई निर्मूलनाच्या उद्देशाने काम करण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. समन्वय बैठकीत राजकीय चर्चा होत नाही, असे ठामपणे सांगितले जात असले तरी आजच्या बैठकीत संघ परिवारातील संघटनांवर लोकसभा निवडणुकीत कोणती जबाबदारी देता येईल, याचा पूर्ण अंदाज भाजप मंत्र्यांनी बांधला.
११ पैकी ६ जिल्हे भाजपकडे
प्रांत समन्वय बैठकीत ११ जिल्ह्यांतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांत भाजप खासदार आहेत. औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी व्यहूरचना करण्यासाठी काय मुद्दे हाताशी असावेत, यावर भाजपचा भर राहणार असल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेनेवर युती करण्यासाठी एका प्रकारे दबाव आणण्यासाठी सदरील बैठकीला भाजप मंत्र्यांनी हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.
रुग्ण, नातेवाईकांचे बंदोबस्तामुळे हाल
हेडगेवार रुग्णालय परिसरात प्रांत समन्वय बैठकीला मुख्यमंत्र्यांसह मंत्री येणार असल्यामुळे पोलिसांनी गजानन महाराज मंदिर ते त्रिमूर्ती चौक बंदोबस्तासाठी ताब्यात घेतला होता. रुग्ण व नातेवाईकांची या बंदोबस्तामुळे तारांबळ झाली. रुग्णालयासमोरील किरकोळ चहा विक्रेत्यांसह इतर दुकानदारांवरही परिणाम झाला. रुग्णालय परिसरात बौद्धिक घेण्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे प्रतिष्ठानने तेथे जागा उपलब्ध करून दिली, असे आयोजकांनी सांगितले.