शिवाजीनगर भुयारी मार्गात उंचीची ‘कोंडी’; मोठ्या वाहनांचा विचारच नाही, कोंडीचा प्रश्न कायम
By संतोष हिरेमठ | Published: January 13, 2024 01:17 PM2024-01-13T13:17:38+5:302024-01-13T13:18:37+5:30
भुयारी मार्ग झाल्यानंतरही वाहतूक खोळंबण्याचा प्रश्न कायम राहण्याची भीती
छत्रपती संभाजीनगर : मोठ्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले; मात्र या भुयारी मार्गाच्या ‘उंची’चीच कोंडी झाली आहे. भुयारी मार्ग झाल्यानंतर मोठी वाहने भुयारी मार्गातून जाणार नसल्याची स्थिती आहे. त्यातून भविष्यात भुयारी मार्ग अडचणीचाच ठरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून भुयारी मार्गाची उंची आताच अधिक ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. या भुयारी मार्गाच्या कामाला वर्षभराचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. सातारा-देवळाई, सिंदोन-भिंदोन, बाळापूरसह लगतच्या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे; परंतु हा भुयारी मार्ग केवळ छोट्या वाहनांना नजरेसमोर ठेवूनच तयार केला जात असल्याने भविष्यात तो किती उपयोगी ठरेल? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाची उंची कमी राहिल्यास भविष्यात मोठ्या वाहनांचा भार संग्रामनगर उड्डाणपुलावरच राहील.
किती आहे शिवाजीनगर भुयारी मार्गाची उंची?
शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी रेल्वे रुळाखाली वाहनांना ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बाॅक्स करण्यात येणार आहे. या बाॅक्सची लांबी ५.५० मीटर आणि उंची ३.५० मीटर राहणार आहे, तर संपूर्ण भुयारी मार्ग हा २२.७६ मीटर लांब असणार आहे. ६.४२ कोटी रुपयांच्या खर्चातून हा भुयारी मार्ग होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संग्रामनगर भुयारी मार्गाची उंची किती?
संग्रामनगर उड्डाणपूल उभारल्यानंतर नागरिकांनी पाठपुरावा करून येथे भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाला भाग पाडले. या भुयारी मार्गावर लांबी आणि उंची नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार या भुयारी मार्गाची उंची ३.१० मीटर या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे.
उंची वाढविण्याची मागणी करू
रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वेगवेगळ्या एजन्सींकडून शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम मुदतीत झाले पाहिजे. भुयारी मार्गातून मोठ्या बस, मोठी वाहने जाणार नाही. मिनी स्कूल बस जातील. भविष्याचा विचार करून भुयारी मार्गाची उंची वाढविण्याची मागणी केली जाईल.
- ॲड. शिवराज कडू पाटील, उच्च न्यायालय
मोठी वाहने नाही जाणार
शिवाजीनगर भुयारी मार्गातून मोठी वाहने जाणार नाही, असे समजले आहे. शाळेच्या बस, मिनी बस येथून सहजपणे जातील, अशी उंची हवी. त्यासाठी आताच लक्ष दिले पाहिजे. अन्यथा भविष्यात भुयारी मार्ग गैरसोयीचा ठरू शकतो.
- बद्रिनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती
मोठ्या वाहनांचा विचार केला नाही
संग्रामनगर येथे भुयारी मार्ग करताना मोठ्या वाहनांचा विचार करण्यात आला नाही. येथून केवळ कार जाऊ शकते. शहर बसही जाऊ शकत नाही. भविष्यात वर्दळ वाढली तर मोठी वाहने येथून जाऊ शकणार नाहीत.
- श्रीमंत गोर्डे पाटील, अध्यक्ष, मेट्रो औरंगबाद असोसिएशन