एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरले;कारनंतर केली महामार्गाची हवाई पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:28 PM2022-04-15T12:28:29+5:302022-04-15T12:40:32+5:30
मागील महिन्यात मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गावरून वर्ध्यापासून औरंगाबादपर्यंत हायस्पीड कारने आले होते. हवाई पाहणीनंतर एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरले
औरंगाबाद : पहिल्या टप्प्यात साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. दरम्यान, मागील महिन्यात मंत्री शिंदे वर्ध्यापासून औरंगाबादपर्यंत कारने आले होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. मुंबईपासूनच ते समृद्धी महामार्गाच्या समांतर हवाई मार्गाने आले. त्यानंतर गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांच्यामध्ये समृद्धी महामार्गावर मंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर उतरवलं. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी महामार्गावर उतरून पाहणी केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार आणि जालना ते शिर्डी पूर्णपणे तयार आहे.
प्राण्यांसाठी ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ व ‘अंडरपास’
औरंगाबाद जिल्ह्यातून १२० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जात असून, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्यात आले आहेत, तर सावंगीच्या पूर्वेला पोखरीजवळ बोगदा उभारण्यात आला आहे. पुढे जटवाड्याजवळ डोंगर कापून हा रस्ता गेला आहे. दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वन्यप्राण्यांना अडथळा येऊ नये, विनाव्यत्यय त्यांचा वावर व्हावा, यासाठी या महामार्गावर दोन ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ व दोन ‘अंडरपास’ तयार करण्यात आले आहेत. यापैकी दौलताबादच्या अलीकडे व जटवाड्याजवळ ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ तयार केला जात आहे, तर लासूरजवळ अंडरपास तयार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेऊन वन विभागाने सुचविलेल्या ठिकाणी हे ओव्हरपास व अंडरपास तयार केले जात आहेत. ओव्हरपास महामार्गावरून जाईल. हुबेहूब जंगलातील रस्त्यांची अनुभूती देणारे ओव्हरपास व अंडरपास तयार केले जात आहेत. ज्यामुळे वन्यप्राण्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुक्त संचार करता येईल, याची दक्षता घेतली जात आहे.
चार ठिकाणी पेट्रोल पंपाची सुविधा
जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांना इंधन भरण्यासाठी चार ठिकाणी सुविधा देण्यात आली आहे. याठिकाणी थेट भारतीय तेल कंपन्या पेट्रोल पंप चालविणार आहेत. पंपांचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, महिनाभरात पूर्ण क्षमतेने हे पंप कार्यान्वित होतील.