'नमस्कार औरंगाबाद',येत्या काळात गुंतवणुकीसाठी शहरास प्राधान्य,ब्रिटन उपउच्चायुक्तांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:48 AM2022-03-29T11:48:55+5:302022-03-29T11:51:50+5:30
भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारीतून गुंतवणूक करण्यास या शहराला प्राधान्य देण्यात येईल
औरंगाबाद : औद्योगिक, शैक्षणिक आणि भौतिक सोयी सुविधा औरंगाबादेत चांगल्या आहेत. भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारीतून गुंतवणूक करण्यास या शहराला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन सोमवारी ब्रिटनचे उपउच्चायुक्त लेन गॅमेल यांनी दिले. शहरातील विकासकामांचा आणि स्मार्ट सिटीने केलेल्या कामाचा आढावा देखील त्यांनी घेतला.
स्मार्ट सिटीच्या मुख्यालयाला गॅमेल यांनी मंगळवारी सकाळी भेट दिली. सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीच्या टीमने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या विविध विकासकामांचे सादरीकरण केले. सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा, भौतिक सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. हे वैभव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी औरंगाबाद शहराचे भरभरून कौतुकही केले.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, रणजित दास, मंजू जिल्ला, भास्कर मुंडे, नताशा कौल वर्मा, मेघना बडजाते, प्रसाद कोकीळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, ऑरिकचे शैलेश दाभेकर, मासिआचे मनीष अगरवाल, डॉ. मंगला बोरकर, उपायुक्त अपर्णा थेटे, सौरभ जोशी, संतोष टेंगळे, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती.
भागीदारीसाठी औरंगाबाद उत्तम
सीआयआयचे राज्य अध्यक्ष श्रीराम नारायणन म्हणाले की, औरंगाबाद हे औद्योगिक गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे शहर आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने येथील उद्योग शिष्टमंडळ ब्रिटनमधील मंडळींना सादरीकरण देऊ शकते. नाथ व्हॅलीचे प्राचार्य रणजित दास यांनी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम परत सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली.
नमस्कार म्हणून जिंकली मने...
लेन गॅमेल यांनी प्रारंभीच मराठीत नमस्कार म्हणून उपस्थितांची मने जिंकली. सीईओ पाण्डेय यांना उद्देशून पुढील काही वर्षात किती नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत, असा प्रश्न केला. यावर पांडेय म्हणाले की, जेव्हा जल योजना राबवली जाते, तेव्हा शहराची वाढ आणि विकास होतो. शहरात सध्या नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. त्यावर गॅमेल म्हणाले की, औरंगाबादमध्ये उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. ऑटो क्लस्टर, ऑरिक, उद्योग संघटना यासारखे महत्त्वाचे घटक असल्यामुळे महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शिक्षण क्षेत्रात स्कॉटलंड आणि महाराष्ट्र यांच्या भागीदारीचे महत्त्व देखील गॅमेल यांंनी सांगितले.