सलाम डॉक्टर साहेब! तुमच्यामुळे रोज वाचतोय जीव, तुम्ही रुग्णालयातील देवदूत
By संतोष हिरेमठ | Published: July 1, 2024 05:51 PM2024-07-01T17:51:00+5:302024-07-01T17:52:11+5:30
डाॅक्टर्स डे विशेष: सरकारी अन् खासगी रुग्णालयांतील देवदूत : रुग्णालय प्रमुखांनी केले डाॅक्टरांच्या रुग्णसेवेचे कौतुक
छत्रपती संभाजीनगर : ‘एमआयसीयू’,‘सर्जिकल आयसीसू’, ‘आयसीसीयू’त दाखल रुग्णाचे नातेवाईक देवाचा धावा करीत असतात. त्याच वेळी डाॅक्टर त्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाथी शर्थीचे प्रयत्न करीत असतात. सरकारी असो की, खासगी रुग्णालये, प्रत्येक ठिकाणी आजारपण, अपघातामुळे मृत्यूच्या दाढेत असलेल्या कुणाचा ना कुणाचा तरी जीव वाचविण्याचे काम डाॅक्टर करीत आहेत.
दरवर्षी १ जुलैला ‘डाॅक्टर्स डे’ साजरा केला जातो. घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मनपाची आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयात दररोज प्रत्येक डाॅक्टर रुग्णसेवेसाठी झटत असतो, असे म्हणत या रुग्णालयांतील रुग्णालय प्रमुखांनी आपल्या डाॅक्टरांच्या कामाचे कौतुक केले.
डॉक्टरांबाबत बोलकी आकडेवारी...
-शहरातील डाॅक्टर्स- ३,०००
-महिला डाॅक्टर- ६५० पेक्षा अधिक
-इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) छत्रपती संभाजीनगर शाखेअंतर्गत १७०० डाॅक्टर
जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय एकूण २० वर्ग एक वैद्यकीय अधिकारी तसेच ११५ वर्ग -२ वैद्यकीय अधिकारी
-महापालिकेत ४२ डाॅक्टर
गंभीर मृत्यूच्या दाढेतून बाहेर
डाॅक्टर गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतात. डॉक्टर स्वतःच्या आरोग्यप्रतीही जागरूक असतात. योग, सांघिक खेळ, मॅरेथॉन, ट्रेकिंग, जिम, स्विमिंग आणि संतुलित आहार याची सांगड घालून आपले आरोग्य जपले पाहिजे.
- डाॅ. विकास देशमुख, सचिव, आयएमए
रुग्ण हाच केंद्रबिंदू
एक जुलै ‘डॉक्टर डे’ आहे. सर्व डाॅक्टरांनी रुग्ण केंद्रबिंदू ठेवून रुग्णांचे शारीरिक, मानसिक दुःख दूर करण्याचे प्रयत्न करतात. मनोभावे रुग्णसेवा करतात.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक
सर्व डाॅक्टरांचे अप्रतिम काम
मनपातील आरोग्य विभागात सर्व डाॅक्टर हे अप्रतिम काम करीत आहेत. विविध योजना, कार्यक्रमांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यात येत आहे. महापालिका ‘टीबी’चे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहे. आगामी तीन महिन्यांत ५ ते ६ रुग्णालयांमध्ये प्रसूतिसेवेसह इतर सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
रिकव्हरी रेट जवळपास ९५ टक्के
उपचारासाठी थेट घाटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा रिकव्हरी रेट जवळपास ९५ टक्के आहेत. अपघातग्रस्तांची आणि खासगी रुग्णालयांतून शेवटच्या क्षणी रेफर होणाऱ्या रुग्णांची स्थिती ही चिंताजनक असते. तरीही सगळ्या परिस्थितीला सामोरे जाऊन घाटीतील डाॅक्टर अधिकाधिक प्रयत्न करून रुग्णांचा जीव वाचविण्याचे काम करतात.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी
मनोरुग्णांचा आधारवड
रस्त्यात असलेले मनोरुग्ण लोकांना पाहून अनेकांना किळस येते. त्यांचे राहणीमान, दोन दोन महिने अंघोळ न केलेले, डोक्यावर माश्या घोंगावतात. त्यांची सेवा करताना आनंदित होतात. मात्र शहरातील डाॅ. फारुक पटेल हे दररोज वेड्यांच्या शोधात असतात. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ते झटतात. निराधारांच्या चेहऱ्यावर हसू उमटावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्यांचा जीवन आधार केंद्रात ४० मानसिक रुग्ण आणि बेघर लोक राहत आहेत. ते त्यांची शारीरिक, मानसिक आणि आरोग्यविश्यक संपूर्ण काळजी घेतात.