हॅलो, पीएसआय बोलताेय ! या एका वाक्यावर बेरोजगाराने व्यावसायिकांना लाखो रुपयांना गंडवले
By सुमित डोळे | Published: July 18, 2023 02:05 PM2023-07-18T14:05:53+5:302023-07-18T14:06:36+5:30
विविध व्यावसायिकांना चुना लावणारा तोतया फाैजदार अटकेत
छत्रपती संभाजीनगर : हॅलो, एमआयडीसी वाळूजचा पीएसआय बोलताेय, असे सांगून बीए उत्तीर्ण बेरोजगाराने सात हार्डवेअर व्यावसायिकांना महिन्याभरात अडीच लाखांना चुना लावला. पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून या तोतयाच्या मुसक्या आवळल्या. ज्ञानेश्वर नारायण देशमुख (३६, रा. पुंडलिकनगर) असे आरोपीचे नाव आहे.
एन-४ मधील व्यावसायिक सचिन काळे यांना ३ जुलै रोजी अनाेळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने तो स्वत: एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अधिकारी आहे. त्याला एक इनव्हर्टर बॅटरी हवी असल्याचे सांगितले. माणसाला वस्तू घेण्यासाठी पाठवून फोन पेवर पैसे पाठवतो, असा विश्वास दिला. काळे यांनी बॅटरी दिली. मात्र, त्याने प्रतिसाद देणेच बंद केले. शहरात सिटी चौक, सिडको, सातारा परिसरात अनेक इलेक्ट्रिक, हार्डवेअर, रंग, प्लंबिंग साहित्य व्यावसायिकांना महिन्याभरात गंडा घातल्याच्या अशा अनेक घटना घडल्या.
पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांना दोन दिवसांपूर्वी एक पोलिस अधिकारी काही बॅटरी, रंगाच्या बकेट विकण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली. उपनिरीक्षक मेघा माळी, गणेश डोईफोडे, जालिंदर मांटे, संतोष पारधे, दीपक देशमुख, दीपक जाधव, राजेश यदमळ, अजय कांबळे, कल्याण निकम, नीलेश शिंदे आणि संदीप बीडकर यांच्यासह साध्या वेशात पोलिसांनी सापळा रचला. ज्ञानेश्वर खबऱ्याच्या दिशेने येताच त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने व्यावसायिकांना फसवल्याची कबुली दिली. दोन पंप, रंगाच्या दहा बकेट, ड्रील मशीन, दोन इनर्व्हटर, पाच बॅटरी व अन्य असे अडीच लाखांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
ट्रु कॉलरवर उल्लेख, पीएसआय म्हणून बोलायचा
बीए पास ज्ञानेश्वरने काही ठिकाणी चालक म्हणून काम केले होते. ट्रु कॉलरच्या प्रोफाईलवर ’पीएसआय शिंदे साहेब’ असा त्याने स्वत:चा उल्लेख केला होता. त्याद्वारे तो कॉल करायचा. माझा माणूस सामान घ्यायला येईल, असे सांगून स्वत:च साहेबांचा हवालदार म्हणून सामान घ्यायला जायचा. ऑनलाईन पैसे पाठवतो म्हणत घाईत निघून जायचा.