हेल्मेटसक्ती लागू
By Admin | Published: March 15, 2016 12:53 AM2016-03-15T00:53:52+5:302016-03-15T01:02:43+5:30
नांदेड : शहरात सोमवारपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करताना ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशा दुचाकीस्वारांकडून दंड आकारणी केली़
नांदेड : शहरात सोमवारपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करताना ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशा दुचाकीस्वारांकडून दंड आकारणी केली़ विशेष म्हणजे शहरातील बहुतांश दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नाहीत़ दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी शहरात हेल्मेटसक्तीची मोहिम सुरूच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी स्पष्ट केले़
सोमवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांसाठी ‘पावतीरूपी सापळा’ रचला होता़ वाहतूक शाखेच्या या सापळ्यात पहिल्याच दिवशी २०० हून अधिक दुचाकीस्वार सापडले़ रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील काही भागात ही कारवाई सुरूच होती़ न्यायालयाचे निर्देश आणि मोटार वाहन अधिनियमांचा आधार घेत वाहतूक शाखेने सोमवारी अचानक दुचाकीस्वारांना हेल्मेटची विचारणा केली़ त्यावेळी हेल्मेटची सवयच नसलेल्या दुचाकीस्वारांना दंडाची पावती फाडण्याशिवाय पर्याय उरला नव्हता़
सोमवारी शहरात वजिराबाद, शिवाजी महाराज पुतळा परिसर, तिरंगा चौक, महात्मा फुले चौक आयटीआय, अण्णाभाऊ साठे चौक, जुना मोंढा आदी भागात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून दंड आकारणी केली जात होती़ वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास नारनवर, पोलिस उपनिरीक्षक ढवळे, पोहेकॉ अजय सावळे, दत्ता घुगे आदी कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत समावेश होता़
मोहिमेबाबत पोलिस निरीक्षक नारनवर यांनी सांगितले, हेल्मेटसक्तीची मोहिम ही दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठीच आहे़ त्यात कायदाही असून त्याचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे़ अनेक अपघातात दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्याने गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते़ ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले़
पोलिस अधीक्षक दहिया यांनीही या मोहिमेची गरज असल्याचे सांगितले़ दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती हा विषय नवीन नाही़ या कायद्याची सर्वांनाच माहिती असून दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे़ पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये हेल्मेटवापराबाबतचे प्रबोधन केले आहे़ आता कायद्याची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत़
दरम्यान, शहरात रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा पार पडला़ त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हेल्मेटसक्ती लागू झाली़ अचानक सुरू झालेल्या सक्तीमुळे वाहनधारक मात्र वैतागले होते़ (प्रतिनिधी)