जीपीएसप्रणालीसाठी एसटीला मदतीचा हात
By Admin | Published: January 2, 2015 12:35 AM2015-01-02T00:35:17+5:302015-01-02T00:50:38+5:30
औरंगाबाद : एसटी बसगाड्यांना जीपीएसप्रणाली बसविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आवश्यक ती मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : जनसामान्यांची प्रवास वाहिनी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांना जीपीएसप्रणाली बसविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आवश्यक ती मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
राज्यातील एसटी आगारांच्या संगणकीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षेनंतर बसगाड्यांना जीपीएसप्रणाली बसविण्यासाठी महामंडळाकडून पाऊल उचलण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी निम्म्या अनुदानावर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या शिवनेरी अणि सेमी लक्झरी बसमध्ये जीपीएसप्रणाली आहे; परंतु फारशी कार्यान्वित नसल्याचेच दिसून येते. प्रवाशांना बसल्या जागी बसगाड्यांचे लोकेशन कळण्यासाठी जीपीएसप्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकास नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे गुरुवारी कचऱ्याच्या २० पेट्या देण्यात आल्या. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. रंजन माहेश्वरी यांनी जीपीएसप्रणालीविषयी माहिती दिली. देशभरातील बस वाहतूक सेवांमधील जीपीएसप्रणालीचा अभ्यास करून ती बसगाड्यांना बसविण्यासाठी मदत केली जाईल. तसेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना संगणकीय मार्गदर्शनही केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आगार व्यवस्थापक एल.व्ही. लोखंडे, उदय जोशी, शशीकुमार गेरा, शरद होसूरकर, एम.जे. काझी, बोडखे, बिराजदार आदी उपस्थित होते.