डोळ्यादेखत बुडणाऱ्या मुलाला असहाय बाप वाचवू शकला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:03 AM2021-08-14T04:03:57+5:302021-08-14T04:03:57+5:30
वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात शुक्रवारी पाण्यात बुडत असलेल्या बैलाला वाचविण्यासाठी गेलेल्या हडसपिंपळगाव येथील एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ...
वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात शुक्रवारी पाण्यात बुडत असलेल्या बैलाला वाचविण्यासाठी गेलेल्या हडसपिंपळगाव येथील एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. आरडाओरड करूनही आसपास मदतीसाठी कोणीही नसल्याने हताश बापाच्या डोळ्यासमोरच ही घटना घडली. रामकिसन अण्णा रंधे (३५), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
रंधे यांची करंजगाव शिवारात जमीन आहे. रामकिसन व त्यांचे वडील अण्णा रंधे हे बोर नदीच्या काठावर बैल चारत होते. त्यांचा बैल बोर नदीपात्रात पाणी पीत असताना खोल पाण्यात पडला. या पात्रातून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मुरूम उचलल्याने मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडले आहेत. बैल पडलेल्या खड्ड्यात जवळपास ४० फूट पाणी होते. बैल बुडताना पाहून रामकिसन यांनी बैलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बुडू लागले. वडील अण्णा रंधे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी जोरजोराने आरडाओरड केली. मात्र, जवळपास कुणी नसल्याने मदत मिळू शकली नाही. त्यामुळे डोळ्यांदेखत त्यांचा मुलगा रामकिसन यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यांच्या मृतदेहाचे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर आघाडे हे करीत आहेत.
चौकट
नागपंचमीच्या दिवशीच रंधे कुटुंबावर आघात
नागपंचमी सणाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने रंधे परिवारावर मोठा आघात झाला. डोळ्यादेखत मुलगा बुडाल्याने अण्णा रंधे यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटोसह
130821\20210813_194506.jpg
राम किसन रंधे यांचा फोटो