एक एक विकेट पडत आहे, ४० गद्दारांचे विधासभेत काय होईल: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 01:21 PM2024-04-04T13:21:59+5:302024-04-04T13:34:37+5:30
हेमंत पाटील, भावना गवळींचे तिकीट कापल्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेन, उद्धव साहेबांनी अनेक नेत्यांना अनेकदा खासदार बनवलं. पण आता तुम्ही पाहत असाल एक व्यक्ती अशी आहे की ज्यांना पाच वेळा खासदार बनवलं आज त्यांना दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट नाही मिळालं, दुसऱ्या एकालाही तिकीट नाही मिळाले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी आणि हेमंत पाटील यांच नाव न घेता केली. तसेच आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत आपलं काय होईल, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला.
आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ठाकरे म्हणाले, आणखी दोन-तीन जणांची तिकीट कापली जाणार आहेत. जी गद्दारी करायची होती, उद्धव साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता. तो त्यांनी केला, त्यांनी महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे. यांना मिळवायचे तरी काय होते ? असा सवाल ठाकरे यांनी केला.
एकाही उमेदवार पडला तर राजीनामा देईल, असे म्हणणारे आता तिकीट पण देऊ शकत नाहीत. असे हाल शिंदे गटाचे सध्या आता सुरू आहेत. आता पुढचे चाळीस गद्दार आहे त्यांनी सुद्धा आता विधानसभेत विचार करावा की आपलं नक्की काय होईल. कारण आता दिसत आहे, एक एक विकेट पडत आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपा यांना उमेदवारच मिळत नाही. भाजपाने दोन उमेदवार जाहीर केलेले आहे तेही मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेन तर सर्व उमेदवार जाहीर केले आहेत.
हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कट
शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीतील जाहीर उमेदवार बदलण्यात आला असून हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पाटील यांची उमेदवार रद्द करुन हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भावना गवळी यांना देखील पक्षाने उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी यावेळी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संधी दिली आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.