घाटीतील क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:37 PM2020-10-08T13:37:33+5:302020-10-08T13:39:01+5:30
घाटी रूग्णालयात रूग्णांची सेवा करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी ज्या क्वार्टर्समध्ये राहतात, त्याची दुरावस्था पाहिली तर या क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा, असा विचार पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात क्षणभर तरी डोकावून जातोच.
औरंगाबाद : घाटी रूग्णालयात रूग्णांची सेवा करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी ज्या क्वार्टर्समध्ये राहतात, त्याची दुरावस्था पाहिली तर या क्वार्टर्सपेक्षा गोठा बरा, असा विचार पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात क्षणभर तरी डोकावून जातोच.
५८ वर्षे जुन्या इमारती दुरूस्ती, देखभालीअभावी मोडकळीस आल्या आहेत. ज्या क्वार्टर्समध्ये कर्मचारी राहतात, तेथील सामायिक शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट आहे. दरवाजे मोडकळीस आल्याने शौचालयाला अनेकांनी पडदे लावले आहेत. जगण्यासाठीच्या मूलभूत सुविधा येथे नाहीत, कारण क्वार्टर्समध्ये माणसे राहतात याचाच घाटी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया तेथील रहिवाशांनी व्यक्त केल्या.
इमारतीचे आयुष्य संपले असले तरी अनेक कर्मचाऱ्यांची कुटूंबे नाईलाजाने तिथेचे राहत आहेत. जिन्यात साचलेले कचऱ्याचे ढिग, पावसात गळणारे छत, बंद पथदिवे, ठिकठिकाणी वाढलेले रानगवत यामुळे क्वार्टर्सला अवकळा आली आहे. येथे फक्त चार भिंती आहेत, बाकी काहीच नाही. येथे राहणे म्हणजे शाप असून जिवंतपणी नरकयातना भोगण्यासारखे आहे, अशा भावनाही येथील रहिवाशांनी व्यक्त केल्या.