केशर आंबा विकला इथेच

By Admin | Published: June 29, 2014 12:56 AM2014-06-29T00:56:33+5:302014-06-29T01:09:29+5:30

औरंगाबाद : आपल्या अवीट गोडीने खवय्यांच्या पोटात स्थान मिळविलेला मराठवाड्यातील केशर आंबा यंदा येथेच विकला.

Here is the sale of saffron mango | केशर आंबा विकला इथेच

केशर आंबा विकला इथेच

googlenewsNext

औरंगाबाद : आपल्या अवीट गोडीने खवय्यांच्या पोटात स्थान मिळविलेला मराठवाड्यातील केशर आंबा यंदा येथेच विकला. मात्र, नगर व नाशिकमधील १५ टन केशर आंब्याने अमेरिका गाठली. मराठवाड्यात १५० ते २०० टन निर्यातक्षम केशर आंबा तयार केला जातो. मात्र, या वर्षी गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वारे या एकानंतर एक नैसर्गिक आपत्तीसमोर आंबा टिकाव धरू शकला नाही. यातून जो काही आंबा वाचला तो निर्यातीच्या नियमात बसला नाही.
मराठवाड्यात सुमारे २० हजार हेक्टरवर केशर आंबा लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात हापूसनंतर केशर आंबाच मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. सुरुवातीला इंग्लंड, हाँगकॉग, जपान आणि आता अमेरिकावासीयांच्या जिभेवर केशर आंबा राज गाजवत आहे. निर्यातीचे विक्रम मोडून मराठवाड्याच्या डोक्यावर मानाचा तुरा खोवणारा केशर आंबा मात्र दोन वर्षांपासून निर्यात झालाच नाही. कारण, मागील वर्षी दुष्काळ व यंदा अवकाळी पाऊस, गारपिटीने केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले. जिथे गारपीट झाली त्या क्षेत्रात केवळ २० ते २५ टक्केच आंबा हाती आला आणि जिथे गारपीट, अवकाळी पावसाचा थोडा फटका बसला तेथे ५० टक्केच आंबा हाती आला. दरवर्षी मे महिन्यात येणारा केशर आंबा यंदा मेच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात दाखल झाला. तब्बल महिनाभर तो उशिरा बाजारात आला. निर्यातीसाठी केशर आंब्याचे वजन कमीत कमी २२० ते २५० ग्रॅम असावे लागते. केशर आंबा निर्यातीसाठी त्याचे काढणीपूर्व व काढणीपश्चात व्यवस्थापन करावे लागते. यंदा आंब्याचे वजन घटल्याने उत्पादकांनी निर्यातीचा नाद सोडून दिला. मराठवाड्यात ३६ शेतकरी आहेत जे निर्यातक्षम आंबा तयार करू शकतात.
जालना येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, याचा फायदा नगर व नाशिक येथील उत्पादकांनी घेतला. नेवासा परिसरातील धनंजय पाटील व निफाड येथील महेश आंतूरकर या दोन शेतकऱ्यांचा १५ टन केशर आंबा यंदा अमेरिकेला निर्यात झाला असल्याची माहिती सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली.
१० टक्के आंबे झाडावर शिल्लक
हिमायत बाग फळ संशोधन केंद्रातील डॉ. संजय पाटील म्हणाले की, मराठवाड्यात १५ ते २० हजार हेक्टरवर केशर आंब्याची आमराई आहे. नैसर्गिक अपत्तीतून जो वाचला तो आंबा यंदा महिनाभर उशिरा आला. दोन दिवसांपूर्वीच आम्ही काही आमराईची पाहणी केली असता ५ ते १० टक्के केशर आंबा झाडावर शिल्लक आहे.
निर्यातक्षम फळ तयार झालेच नाही

मँगो ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव त्र्यंबक पाथ्रीकर यांनी सांगितले की, मराठवाड्यात ३६ पेक्षा अधिक शेतकरी निर्यातक्षम आंबा तयार करतात. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आमराईचे व्यवस्थापन करावे लागते. २०० टनांपेक्षा अधिक आंबा येथून निर्यात होऊ शकतो. मात्र, यंदा नैसर्गिक अपत्तीने आंब्याचे मोठे नुकसान झाले. आंब्याच्या वजनावरही त्याचा परिणाम झाला. मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील केशर आंबा निर्यात झाला नाही.
मधुर गोडीची विदेशवारी
मूळचा गुजरातमधील जुनागढचा केशर आंबा मराठवाड्याच्या मातीत रुजला आणि येथील निर्यातीचा राजा बनला. मराठवाड्यातून पहिल्यांदाच १९९८ या वर्षी ५ टन केशर आंबा इंग्लंडला निर्यात झाला होता. त्यानंतर सतत तीन वर्षे इंग्लंड व हाँगकाँगला आंबा निर्यात झाला. यानंतर जपानचे दरवाजे खुले झाले. सहा वर्षांपूर्वी महासत्ता अमेरिकेनेही केशर आंब्याला परवानगी दिली. २००७ या वर्षी ३० टन, तर २००८ या वर्षी ४८ टन केशर आंबा निर्यात झाला होता.

Web Title: Here is the sale of saffron mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.