इथे मिळतेय त्यांना जगण्याचं बऴ़़
By Admin | Published: September 19, 2014 11:49 PM2014-09-19T23:49:54+5:302014-09-20T00:05:48+5:30
श्रीनिवास भोसले, नांदेड आजारांवर उपचार करून थकलेल्या पालकांच्या अन् जीवन जगण्याची आशा हरवलेल्या ‘त्या’ मतिमंद बालकांना जीवन जगण्याचे बळ देण्याचे काम राजस्थानी एज्युकेशन सोसायटी करीत आहे़
श्रीनिवास भोसले, नांदेड
मेंदूशी संबंधित आजारामुळे आलेला मतिमंदपणा़़क़ुणाचे हात वाकडे़़़तर कुणाचे पाय़़़अशा आजारांवर उपचार करून थकलेल्या पालकांच्या अन् जीवन जगण्याची आशा हरवलेल्या ‘त्या’ मतिमंद बालकांना जीवन जगण्याचे बळ देण्याचे काम मुंबईच्या डॉक्टरांसह राजस्थानी एज्युकेशन सोसायटी करीत आहे़
नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने गत पाच वर्षापासून मेंदूशी संबंधित आजार असलेल्या बालकांची तपासणी व उपचार अशा दोन्ही प्रक्रिया पूर्णत: मोफत शिबिरातून केल्या जातात़ गुरूवारपासून नवा मोंढा परिसरातील मालपाणी मतिमंद विद्यालयात सुरू असलेल्या शिबिरात नांदेडसह राज्यभरातून आलेल्या जवळपास चारशेहून अधिक रूग्णांनी तपासणी करून घेतली आहे़
या शिबीरासाठी गत पाच वर्षापासून मुंबई येथील जयवकील स्कुल आॅचिल्ड्रन्स इन नीड आॅफ स्पेशल केअर आणि वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांचे सहकार्य मिळत आहे़ यापूर्वीच्या शिबिरामध्ये मेंदूशी संबंधित आजार असलेल्या नांदेड शहरातील ७०६, जिल्ह्यातील ८२९, हिंगोली- १११, परभणी- १०६, लातूर-३१, जालना- २७, औरंगाबाद-२१, यवतमाळ- ५२ यासह बीड, अकोला, वाशिम, पुणे, मुंबई, बिदर, आदिलाबाद, हैदराबाद आदी ठिकाणच्या २२०० रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी सांगितले़
शिबिरामध्ये रूग्णांना मोफत इसीजी, सीटी स्कॅन, एमआरआय, थेरपी प्रोग्राम, तपासणी, औषध वाटप केले जात आहे़ नियमित थेरपी व उपचारासाठी डॉ़ लक्ष्मीकांत बजाज यांनी शाळेमध्ये फिजीथेरपी हॉल उपलब्ध करून दिला आहे़ यामुळे थेरपी करणे सोयीस्कर आणि सुलभ होत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले़
राज्याचा सर्व्हे करून आम्ही धुळे आणि नांदेडची निवड केली़ यात नांदेडमध्ये राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार महत्वाचा होता़ अशा शिबिरातून गरजू आणि गरीब रूग्णांना उपचार मिळत आहेत़ परंतु या ठिकाणी आता शिबिराऐवजी कायमचे एक सेंटर सुरू व्हावे, अशी अपेक्षा मुंबईच्या डॉ़ अनैता हेगडे-वुडवाडीया यांनी व्यक्त केली़ ३०० रूग्णांपासून सुरूवात झाली ती संख्या आज हजारामध्ये आहे़ रूग्णांची गरज ओळखून नांदेडात कायम मोफत उपचार देणारे सेंटर उभे राहिल्यास आनंदच होईल असे त्या म्हणाल्या़ येथील शिबिरामध्ये येणाऱ्या मतिमंद बालकांची संख्या आणि त्या आजाराच्या उपचारासाठी लागणारा खर्च पाहता शासनाने भरीव मदत द्यावी, अशी अपेक्षा संस्थेचे रामनारायण काबरा यांनी व्यक्त केली़
काय आणि कसा आहे आजार?
जन्मानंतर किंवा जन्माआधी मेंदूला इजा झाल्यास बालकास मस्तिक आजार होतो़ यातून आॅटीझम, फीट, नसांचे आजार, बहुविकलांगता येते़ अपंगत्व वयोमानानुसार वाढत जात असल्याने याचा वाचा आणि श्रवणावर परिणाम होतो़ शरीराच्या हालचालीवरही नियंत्रण नसल्याने अशा बालकांच्या विकासात अडचण येते़
अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये़
सदर आजार अनुवांशिक किंवा संसर्गजन्य नाही़ अज्ञान आणि गरिबीमुळे काही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात़ स्थानिक पातळीवर तज्ञ डॉक्टरांची अल्प संख्या व तंत्रज्ञानाचा अभाव तसेच उपचार महागडा असल्याने या आजाराची पुरेशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असते़
अद्यावत सुविधांची गरज
शासकीय रूग्णालयात एमआरआय मशीन, सीटी स्कॅन मशिन, एक्स-रे आदी अद्यावत प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्यास रूग्णांच्या नातेवाईकांना आणि मोफत शिबीर घेणाऱ्या संस्थांना सोईचे होईल़ नांदेडच्या शासकीय रूग्णालयात एमआरआय उपलब्ध नसल्याने खासगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे़