‘एमटीडीसी’चा हेरिटेज वॉक दोन महिन्यातच बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:16 AM2017-08-24T01:16:19+5:302017-08-24T01:16:19+5:30
केवळ दोन महिन्यांतच अधिकाºयांचा उत्साह ओसरल्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम बंद पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केवळ दोन महिन्यांतच अधिकाºयांचा उत्साह ओसरल्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम बंद पडला. लोकांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता ‘एमटीडीसी’ने हा उपक्रम बंद करून ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’तर्फे आयोजित केल्या जाणाºया हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगेट नामशेष झाल्यानंतर शहरातील काही इतिहासप्रेमींनी ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’च्या माध्यमातून एकत्र येऊन ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू केला होता. हे पाहून पर्यटन विभागालाही त्यांच्या बंद पडलेल्या ‘हेरिटेज वॉक’ची आठवण झाली आणि त्यांनी जून महिन्यात तो सुरू केला.
त्यानुसार सोनेरी महाल, नौखंडा पॅलेस आणि भडकल गेट येथे भेट देण्यात आली. दरवेळी लोकांची संख्या कमी होत गेली. महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी वॉक आयोजित करण्याचे मंडळाचे नियोजन होते. मात्र, ५ आणि १९ आॅगस्ट या पहिल्या व तिसºया शनिवारी वॉक झाला नाही.
डॉ. रफत व दुलारी कुरेशी या इतिहास अभ्यासक दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यापासून नियमित हेरिटेज वॉकचे यशस्वी आयोजन केले जात आहे. त्यांच्या उपक्रमांना शेकडो लोकांची उपस्थिती असते. ‘एमटीडीसी’ला ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’च्या यशस्वी ‘मॉडेल’चे अनुकरण करणे जमले नाही. त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळालाच नाही. म्हणून त्यांच्यावर हा उपक्रम पुन्हा बंद करण्याची वेळ आली. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या पुढाकाराने शहरातील वास्तूंबद्दल नागरिकांना माहिती व्हावी व जनजागृती वाढावी या उद्देशाने गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ‘एमटीडीसी’द्वारे हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला होता. मात्र, कोणतीही पूर्वसूचना अथवा स्पष्टीकरण न देता तो त्यावेळी बंद करण्यात आला होता.