हर्सूल टी पॉइंटने घेतला मोकळा श्वास; रस्त्यावरील १५ अतिक्रमणे मनपाने हटविली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:24 AM2023-10-13T11:24:39+5:302023-10-13T11:25:39+5:30
हर्सूल कारागृहाच्या भिंतीला लागून व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केली होती. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल टी पाॅइंट येथे अघोषित बसथांबा झाला आहे. या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी असते. वाढत्या गर्दीमुळे परिसरात अनधिकृत दुकानांची संख्याही झपाट्याने वाढू लागली. हर्सूल कारागृहाच्या भिंतीला लागूनच चहा, फळ विक्रेत्यांनी काही दुकाने थाटली होती. पोलिस आणि कारागृह अधीक्षक यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाकडे पाठपुरावा सुरू केला. बुधवारी अतिक्रमण हटाव विभागाने कारवाईचा बडगा उगारला. तब्बल १५ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
कारागृहाच्या भिंतीला लागूनच दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ऑगस्ट महिन्यात सूचना देऊन स्वत: अतिक्रमण काढावे म्हणून कळविले होते. काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेतले. काहींनी प्रशासनाला जुमानले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी जेसीबीने अतिक्रमणे हटविली व दोन लोखंडी टपऱ्या जप्त करण्यात आल्या. हर्सूल रोडवर मांस विक्रीची दुकाने थाटली होती. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांची सुनावणी सोमवारी सायंकाळी चार वाजता अतिरिक्त आयुक्त घेणार आहेत. ही कारवाई उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त अशोक गिरी, निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे आणि हर्सूल पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.
जटवाडा रोड मोकळा करा
जटवाडा वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. ओव्हर, जटवाडा, धोपटेश्वर, गोळेगाव, अंबर हिल, होनाजी नगर, सारा वैभव, एकता नगर, सईदा कॉलनी आदी अनेक वसाहतींना हा मुख्य रस्ता आहे. रस्त्यांवर बसणारे पथविक्रेते, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ताही महापालिकेने मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.