अहो, ‘संडे’ला डाॅक्टर असतात का? जिल्हा सामान्य रुग्णालयात काय दिसले ?
By संतोष हिरेमठ | Published: September 11, 2023 08:09 PM2023-09-11T20:09:02+5:302023-09-11T20:09:24+5:30
रुग्णालय प्रशासन ‘हाय अलर्ट’, पण एका डाॅक्टरवर अनेक वाॅर्डांचा भार
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी डाॅक्टर असतात का, असा प्रश्न रुग्णांना, नातेवाइकांना पडतो. कारण रविवारी मोजकेच डाॅक्टर हजर असतात, तर काही डाॅक्टर ‘ऑन काॅल’ असतात. परिणामी, रविवारी डाॅक्टरांची संख्या अपुरी असते. त्यामुळे एका डाॅक्टरला किमान दोन ते वाॅर्डांची जबाबदारी सांभाळावी लागते. ‘आयसीयू’ सोडूनही डाॅक्टरांना इतर वाॅर्डात जावे लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गत रविवारी म्हणजे ३ सप्टेंबरला एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर डाॅक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून नातेवाइकांनी आयसीयूच्या काचा फोडत संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या रविवारी जिल्हा रुग्णालयात ‘आयसीयू’सह विविध वाॅर्डांची पाहणी केली. घाटीप्रमाणे प्रत्येक वाॅर्डात डाॅक्टर देणे शक्य नसून, एका निवासी डाॅक्टरला किमान दोन वाॅर्ड सांभाळावे लागतात, असे सांगितले जाते.
काय आढळले?
अपघात विभागात दोन डाॅक्टर आणि दोन परिचारिका होत्या. एका अपघातग्रस्त रुग्णाची तपासणी केली जात होती, तर उलट्यांचा त्रास होणाऱ्या बालकाचीही तपासणी सुरु होती. ‘आयसीयू’मध्ये पाहणी केली. तेव्हा येथे एक परिचारिका आणि एक महिला कर्मचारी होत्या. डाॅक्टरांविषयी विचारणा केल्यावर आताच डाॅक्टर मॅडम आणि निवासी डाॅक्टर वरच्या मजल्यावर राऊंड घेण्यासाठी गेले असून, लगेच येतील, असे त्यांनी सांगितले. इतर काही वाॅर्डांमध्येही केवळ परिचारिकाच पाहायला मिळाल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले..
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे म्हणाले, रविवारी कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर (सीएमओ) आणि ड्यूटी मेडिकल ऑफिसर (डीएमओ) हजर असतात. तसेच विविध विषयांतील विशेषज्ज्ञ, जसे फिजिशियन, सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ व इतर तज्ज्ञ ऑन कॉल हजर असतात. त्यावर देखरेख करण्यासाठी त्या विषयाचे विशेषज्ज्ञ एक वैद्यकीय अधिकारी हजर असतात. गरज वाटली तर रुग्णास दाखल केले जाते. गरज भासल्यास अतिदक्षता विभागात पाठवले जाते. तेथेही तातडीने उपचार होतात.
जिल्हा रुग्णालयात किती डाॅक्टर्स?
- वर्ग -१ चे १० डॉक्टर.
- वर्ग -२ चे ३० डॉक्टर.
- निवासी डाॅक्टर -४२
- कान- घसातज्ज्ञांची जागा रिक्त
- त्वचारोगतज्ज्ञांची जागा रिक्त