अगं अगं सूनबाई ! काय म्हणता सासूबाई ? मंगळागौरीच्या गाण्यात चंद्रयान, समृद्धी मार्गाची छाप
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 25, 2023 07:35 PM2023-08-25T19:35:55+5:302023-08-25T19:36:05+5:30
काही ठिकाणी सासरी तर काही ठिकाणी माहेरी मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर : नवविवाहितांनी मंगळागौरी व महादेवाची विधीवत पूजा केली आणि त्यानंतर सर्व जणींनी मिळून फुगडीपासून ते सासू-सुनांच्या थट्टा मस्करीपर्यंतचे विविध खेळ खेळून धम्माल उडवून दिली. ''अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई'' या गाण्याला तर उपस्थित नातेवाईकांनी दाद दिली.
निज श्रावणातील पहिला मंगळवार आणि पहिली मंगळागौर. काही ठिकाणी सासरी तर काही ठिकाणी माहेरी मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते. काहींनी घरात तर काहींनी मंगल कार्यालयात पूजा मांडली होती. महादेवाची पिंड आणून पूजा करण्यात आली. विविध झाडांची पाने, फुले यांनी पूजा सजविण्यात आली होती. नवविवाहिताच नव्हे तर घरातील आजीबाईही विविध दागिने घालून नटल्या होत्या. मग मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिलांचा ग्रुप आला. १० ते १२ प्रकारे फुगडी खेळण्यात आली. त्यात सासू- सुनेची फुगडी, विहीणबाईची फुगडी, ताक फुगडी, दहीवडा, झिम्मा, तळ्यात- मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा या खेळ-गाण्यांचा महिलांनी आनंद लुटला, तिखट मीठ मसाला, ''कीस बाई कीस... दोडका कीस'', माझी आई मोठी की तुझी आई मोठी'' असे अनेक खेळ एका मागून एक घेण्यात आले. या खेळात दोन तास कसे निघून गेले, हे कोणाला कळालेच नाही. त्या नंतर सर्वांनी एकत्र जेवणावर ताव मारला.
सेल्फीच्या उखाण्याला मिळाली दाद
हडकोतील कुलस्वामिनी मंडळातील महिलांनी मंगळागौरीचा खेळ खेळत व नावीन्यपूर्ण उखाणे म्हणत धमाल उडवून दिली. '' मोबाईलच्या दुनियेला व्हॉट्स ॲपचा वेढा, महेशरावांना म्हटलं आपली एक तरी सेल्फी काढा'' या उखाण्याला टाळ्यांची साथ मिळाली. त्याचबरोबर वृषाली घन, कल्याणी पूर्णपात्रे, प्राजक्ता दिवेकर, अनिता चौधरी, सुलभा वाकळे, संगीता देशपांडे, अनामिका पाटील, अदिती राजहंस, भक्ती कुलकर्णी, अनिता कार्यकर्ते, अमृता कार्यकर्ते, पूजा रामदासी यांनी उखाणे म्हणत आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवून दिली.
चंद्रयान ३ ची क्रेझ मंगळागौरीत
ओंजळ ग्रुपने मंगळागौरीच्या खेळात पारंपरिकता व नव्या खेळांचा उत्तम संगम साधला.