एचएचसी बोर्डात खळबळ; फिजिक्सच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांत एकच हस्ताक्षर
By विजय सरवदे | Published: May 19, 2023 07:05 PM2023-05-19T19:05:40+5:302023-05-19T19:06:50+5:30
उत्तरपत्रिकांना नेमके कोठून पाय फुटले, हा साराच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे.
छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच बोर्डात एकच खळबळ उडाली. दरम्यान, ही बाब तातडीने राज्य शिक्षण मंडळास कळविण्यात आली असून या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आता तोंडावर बोट ठेवले आहे.
प्रामुख्याने बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही केंद्रांमधील या उत्तरपत्रिका आहेत. आठ दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे; पण अद्यापही विभागीय शिक्षण मंडळाचे अधिकारी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू शकले नाही. बोर्डात यासंदर्भात प्रचंड गोपनियता बाळगली जात आहे. ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर आहे, तर मग सेंटरच मॅनेज झाले होते की उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या. उत्तरपत्रिकांना नेमके कोठून पाय फुटले, हा साराच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही प्रथमदर्शनी उत्तरपत्रिकांमध्ये अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिलेली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यासंदर्भात दोन- तीन दिवसांत मॉडरेटर्सची चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.