हाय, हॅलो छोडो, जय अग्रसेन बोलो
By Admin | Published: October 2, 2016 01:18 AM2016-10-02T01:18:52+5:302016-10-02T01:21:05+5:30
औरंगाबाद : ‘हाय, हॅलो छोडीये, जय अग्रसेन बोलीये,’ ‘जोर से बोलो, जय अग्रसेन, हर कोई बोलो, जय अग्रसेन’ असा जयघोष शनिवारी सकाळी शहरात घुमला.
औरंगाबाद : ‘हाय, हॅलो छोडीये, जय अग्रसेन बोलीये,’ ‘जोर से बोलो, जय अग्रसेन, हर कोई बोलो, जय अग्रसेन’ असा जयघोष शनिवारी सकाळी शहरात घुमला. छत्रपती श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेद्वारे अग्रवाल समाजबांधवांनी ‘अग्र-एकतेचे’ दर्शन घडविले. या शोभायात्रेवर पावसाच्या सरी बरसल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता.
शहागंजमधील गांधी पुतळा चौकात अग्रवाल समाजबांधव एकवटले होते. विविधरंगी जरबेराने सजविलेल्या ट्रॉलीत सिंहासनावरील अग्रसेन महाराजांची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली होती. अग्रसेन महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी इको फ्रेंडली फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला आणि हवेत फुगे सोडून सकाळी ९.३० वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. यात छत्तीसगड राज्यातील कृषिमंत्री बृजमोहन अग्रवाल सहभागी झाल्याने सर्वांचा उत्साह वाढला होता. यावेळी आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, महापौर त्र्यंबक तुपे, प्रदीप जैस्वाल, नंदकुमार घोडेले, डॉ. भागवत कराड, प्रशांत देसरडा तसेच महावीर पाटणी, डॉ.पुरुषोत्तम दरख, संजय मंत्री आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांचे स्वागत अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका यांनी केले. शोभायात्रेत अग्रभागी राजस्थानी पारंपरिक पोशाख परिधान केलेले पाच युवक अश्वारूढ झाले होते.
सजविलेल्या रथावर अग्रसेन महाराजांच्या वेशभूषेत संकोच भारुका व माता माधवीदेवीच्या वेशभूषेत पायल भारुका विराजमान झाले होते. सिटीचौक, गुलमंडी, पैठणगेट, क्रांतीचौक, जालना रोडमार्गे शोभायात्रा सिडकोतील अग्रसेन चौकात पोहोचली. येथे अग्रस्तंभास अभिवादन करण्यात आले. सायंकाळी अग्रसेन भवनात महाप्रसादाने अग्रमहोत्सवाची सांगता झाली.
सूत्रसंचालन विशाल लदनिया यांनी केले. शोभायात्रेत आनंद भारुका, जगदीश अग्रवाल, अशोक अग्रवाल, विजय गोयल, दिलीप अग्रवाल, डॉ. मनोहर अग्रवाल, विजय अग्रवाल, रतनलाल अग्रवाल, संदीप गोयल, कपिल टिबडीवाल, पुरुषोत्तम अग्रवाल, भगवान टिबडीवाल, नंदकिशोर पित्ती, राजकुमार अग्रवाल, अॅड. अनुप अग्रवाल, सीताराम अग्रवाल, अॅड. मुकेश गोयंका, प्रफुल्लकुमार अग्रवाल, राजेश टकसाली, नवनीत भारतिया, गोपाल भारुका, दीपक अग्रवाल, अल्केश अग्रवाल, निर्मला अग्रवाल, सुनीता अग्रवाल, जयश्री अग्रवाल, रंजनी बगडिया, दिशा अग्रवाल, वंदना बगडिया, मनीष भारुका यांच्यासह सर्व पदाधिकारी, समाजबांधव सहभागी झाले होते.