कितीही लपवा; पण, दात करतात वयाची पोलखोल! गुन्ह्यांसह अनेक प्रकरणांत होते मदत
By संतोष हिरेमठ | Published: June 22, 2023 12:45 PM2023-06-22T12:45:10+5:302023-06-22T12:45:50+5:30
काही वेळेस संशयास्पद मृत्यूनंतर, विशेषत: गुन्ह्यांच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे, हे सांगावे लागते.
छत्रपती संभाजीनगर : दातांवरून एखाद्या व्यक्तीचे वय कळू शकते, हे अनेकांना माहिती नसेल. पण, कोणी कितीही वय लपविले तरी दात त्याचे वय उघडे पाडू शकतात. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात आजवर २,४०० वर व्यक्तींच्या वयाचा छडा लावण्यात आला आहे.
काही वेळेस संशयास्पद मृत्यूनंतर, विशेषत: गुन्ह्यांच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे, हे सांगावे लागते. तसेच अत्याचार प्रकरणांसह अनेक गुन्ह्यांतील आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगून शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीचे वय निश्चित करण्यासाठी दातांची मदत घेतली जाते. जन्मतारीख माहीत नसेल आणि शासकीय कामकाजासाठी वय निश्चित करणे आवश्यक असलेल्या प्रकरणांतही दातांवरून वय शोधले जाते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात १९८२ पासून अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तींच्या दातांवरून वयाचे निदान केले जात असल्याचे सांगण्यात आले.
‘एक्स-रे’सह अनेकांची मदत
वय काढण्यासाठी ‘एक्स-रे’सह विविध विभागांची मदत घेतली जाते. दातांचे दोन प्रकार असतात. दुधाचे दात आणि कायमचे दात. या दोन्ही दातांच्या आकारांत फरक असतो. यावरूनही वय सांगता येते. अक्कलदाढ आलेली आहे की नाही, यावरूनही वय कळू शकते.
पीडितेला घेतलेल्या चाव्यावरून आरोपीचा शोध
नांदेड येथे एका प्रकरणात पीडितेला आरोपीने चावा घेतला होता. चावा घेतलेल्या जागेतील दातांच्या ठशांवरून आरोपी निश्चित करण्यासाठीही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वेगवेगळ्या प्रकरणांत वयाचे निदान
मेडिकोलेगल केसेस, अत्याचार प्रकरणांसह विशिष्ट श्रेणीतील खेळातील खेळाडूंचे वयाचे निदान दातांवरून केले जाते. त्यासाठी विविध विभागांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. १९८२ पासून आतापर्यंत २,४८२ लोकांच्या वयाचे निदान करण्यात आले आहे.
- डाॅ. एस. पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
- १९८२ ते २०२३ पर्यंत किती जणांचे दातांवरून वय शोधले? - २,४८२
गेल्या १० वर्षांत दातांवरून किती जणांचे वय शोधले?
वर्ष - संख्या
२०१४ - ९७
२०१५ - ७८
२०१६ - ८९
२०१७ - ९४
२०१८ - ११०
२०१९ - १६२
२०२० - २५
२०२१ - ५०
२०२२ - ८३
२०२३(आतापर्यंत) - ४८