पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरा संसार मांडला, त्यालाही त्रास; पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा

By सुमित डोळे | Published: July 19, 2024 04:34 PM2024-07-19T16:34:31+5:302024-07-19T16:36:34+5:30

नांदण्यासाठी ५ लाखांची अट, सोबत घर नावावर करण्याची घातली अट

hiding her first marriage and married with second husband, he also suffers; Offense against in-laws along with wife | पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरा संसार मांडला, त्यालाही त्रास; पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा

पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरा संसार मांडला, त्यालाही त्रास; पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक कुरबुरीतून दोघांचे पहिले संसार मोडले. नात्यातीलच असल्याने दोघांनी एकमेकांसोबत दुसरे लग्न करून नव्याने संसार सुरू केला. मात्र, लग्नानंतर पत्नीच्या विविध मागण्यांना कंटाळून तरुणाने अधिक चाैकशी केल्यावर तिचा पहिल्या लग्नाचाच घटस्फोट झाला नसल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याने संतप्त तरुणाने थेट पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यावरून पत्नीसह तिच्या आई, वडील व भावावर सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सामान्यत: कौटुंबिक हिंसाचाराला महिला बळी पडतात. हुंडा न देणे, दिसण्यावरुन टोमणे, मूल न होणे, अशा विविध कारणांवरून विवाहित महिलेवर सासरच्यांकडून अत्याचार होतात. अनेक प्रकरणात पतीकडून फसवणुक होते. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हादेखील दाखल होतो. बुधवारी मात्र ४० वर्षीय पत्नीपिडित सचिन (रा. एन-१२) पत्नीच्याच छळाची तक्रार घेऊन दाखल झाला अणि क्षणभर पोलिसांनाही धक्का बसला. सोळा वर्षांपूर्वी सचिनचे पहिले लग्न झाले होते. परंतु सततच्या कुरबुरीमुळे त्यांच्यात काडीमोड झाला. त्याचदरम्यान त्याच्या नात्यातील अंबड तालुक्यातील कल्पना (नाव बदलले आहे) हिचा पहिला संसार मोडला होता. नातेवाइकांच्या मध्यस्थीने दोघांनी सुखी संसाराच्या आणाभाका घेत दुसरे लग्न केले.

नांदण्यासाठी ५ लाखांची अट, सोबत घर नावावर
२०१६ मध्ये सचिन व कल्पनाला मुलगा झाला. तेव्हा माहेरी गेलेली कल्पना पुन्हा सचिनकडे परतलीच नाही. काही महिन्यांनी तिने थेट सोबत यायची मागणी असेल तर माझ्या बँक खात्यात ५ लाख रुपये व तुझे घर माझ्यावर नावावर झाले पाहिले, अशी अटच टाकली. पहिल्या घटस्फोटातून सावरत असलेल्या सचिनला यामुळेच धक्काच बसला.

...म्हणून गोड बोलणे सुरू
कल्पनाने सचिनवर २०१९ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. त्याचा निकाल मात्र सचिनच्या बाजूने लागला. त्यामुळे कल्पनाने पुन्हा सचिनसोबत गोड बोलणे सुरू केले. कल्पनाच्या विचित्र वागण्यामुळे सचिनने तिच्या कुटुंबाला पहिल्या घटस्फोटाचे कागदपत्र मागितले. ते त्याला मिळाले नाही. अधिक खोलात गेल्यावर कल्पनाचा घटस्फोटच झाला नसल्याचे सचिनला कळाल्यावर त्याला दुसरा धक्का बसला. कायदेशीररीत्या घटस्फोट झालेला नसताना कल्पनाने त्याच्यासोबत लग्न करून फसवणूक केली होती. त्याने निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यावरून पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: hiding her first marriage and married with second husband, he also suffers; Offense against in-laws along with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.