महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:08 AM2017-09-20T01:08:25+5:302017-09-20T01:08:25+5:30
महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा न्या. एस. पी. देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या वेळी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नहर- ए- अंबरीच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेने काय उपाय केले, याबाबत खंडपीठाने नोटीस बजावूनही औरंगाबाद महापालिकेने मुदतीत उत्तर दाखल केले नाही. महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा न्या. एस. पी. देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या वेळी केली. महापालिकेने उत्तर दाखल करण्यासाठी पुन्हा वेळ देण्याची विनंती केली असता खंडपीठाने या ‘जनहित याचिकेची’ पुढील सुनावणी २७ सप्टेंबर २०१७ रोजी ठेवली आहे.
नहर-ए-अंबरीच्या संवर्धनासंदर्भात अॅड. रूपा दक्षिणी यांनी औरंगाबाद खंडपीठात ‘जनहित याचिका’ दाखल केली आहे. या याचिकेवर ७ मार्च २०१७ रोजी प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने महानगरपालिकेस नोटीस बजावून नहर-ए-अंबरीच्या सवंर्धनासाठी काय उपाययोजना केली, याबाबत विचारणा केली
होती.
महानगरपालिकेस खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मुदतीच्या आत उत्तर दाखल केले नाही.
मंगळवारी या जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आली. महानगरपालिकेने वेळेत उत्तर दाखल केले नसल्यामुळे महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा त्यावर करण्यात आली. महानगर पालिकेच्या वतीने अॅड. अंजली दुबे - वाजपेई यांनी उत्तर दाखल करण्यासाठी पुन्हा वेळ देण्याची विनंती खंडपीठास केली. खंडपीठाने ही विनंती ग्राह्य धरून या जनहित याचिकेवर पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.