कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक यांना अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:25 AM2020-12-17T04:25:01+5:302020-12-17T04:25:01+5:30
अवमान याचिकेची पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. याचिकाकर्त्या स्वाती व्यंकटराव बास्टे या अनुसूचित जमाती प्रवर्गातून ...
अवमान याचिकेची पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. याचिकाकर्त्या स्वाती व्यंकटराव बास्टे या अनुसूचित जमाती प्रवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील तालुका कृषी कार्यालय कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत . त्यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित समितीकडे प्रलंबित आहे. तथापि वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरून विभागीय कृषी सहसंचालक यांनी २८ जून २०१९ रोजी बास्टे यांना वैधता प्रमाणपत्र सादर करा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल , असे नोटीसद्वारे सूचित केले. त्यामुळे बास्टे यांनी ॲड. सुनील विभुते यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. बास्टे यांची पडताळणी प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे कुठलीही कार्यवाही करू नये, असे आदेश खंडपीठाने १० जुलै २०१९ रोजी देऊन याचिका निकाली काढली होती.
असे असताना वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याच्या कारणावरून जून २०२० पासून बास्टे यांचे वेतन दिले नाही. त्यामुळे बास्टे यांनी पुन्हा याचिका सादर केली असता बास्टे यांचे वेतन थांबविण्याची नोटीस खंडपीठाने रद्द केली.
या आदेशानंतर देखील विभागीय कृषी सहसंचालक यांनी अद्यापपर्यंत बास्टे यांचे वेतन दिले नाही. त्यांचे हे कृत्य न्यायालयाचा अवमान करणारे असल्यामुळे बास्टे यांनी तांबाळे यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते यांच्या वतीने ॲड. सुनील विभुते आणि सरकारतर्फे सहायक सरकारी वकील जी. एल .देशपांडे यांनी काम पाहिले.