शाळा सोडून सुनावणीसाठी येणा-या शिक्षकांना हायकोर्टाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:42 AM2017-09-30T00:42:43+5:302017-09-30T00:42:43+5:30
शाळा सोडून बदल्यांच्या याचिकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गर्दी करणा-या शिक्षकांना शुक्रवारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शाळा सोडून बदल्यांच्या याचिकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गर्दी करणा-या शिक्षकांना शुक्रवारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला. शिक्षक शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची टिपणी करून न्यायालयाने २७ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवशी ज्या याचिकाकर्त्या शिक्षकांनी रजा टाकल्या आहेत त्या नामंजूर करून अनुपस्थिती लावण्याचे आदेश न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.
१२ सप्टेंबर रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकांवर खंडपीठात सुनावणी झाली. आता या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरला ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत शासन आदेशाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे निवेदन सरकारी वकिलांनी केले, ते खंडपीठाने स्वीकारले. याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळीही शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. असे असताना शिक्षक पुन्हा शुक्रवारच्या सुनावणीवेळी मोठ्या संख्येने खंडपीठात उपस्थित होते.
राज्य शासनाने १२ सप्टेंबर रोजी काढलेल्या नवीन शासन निर्णयानुसार होणा-या बदल्यांना स्थगिती द्यावी, तसेच बदल्या रद्द कराव्यात यासाठी प्राथमिक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अकरा याचिका दाखल केल्या आहेत. राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी नवीन शासन निर्णयाद्वारे शिक्षकांच्या फक्त संवर्ग १ व २ च्या बदल्या या २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संवर्ग
३ व ४ वर अन्याय करणारा
असल्याने १२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात खंडपीठात सहाशेवर शिक्षकांनी ११ याचिका दाखल केल्या आहेत.