Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी; गृहराज्यमंत्री पाटील यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 08:10 PM2018-05-12T20:10:14+5:302018-05-12T20:12:19+5:30
शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुआरफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
औरंगाबाद : शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुआरफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार याविषयाचा निर्णय उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. दिपक सावंत, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आणि (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, रणजीत पाटील म्हणाले, एकाच वेळी चार-पाच ठिकाणी जाळपोळ,दगडफेकीच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलिसांना सर्वच ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. यात सोशल मिडियाच्या गैरवापरामुळे दंगल भडकण्यास हातभार लागला असून, सायबर सेलला याविषयी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दंगलीची सखोल चौकशीसाठी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या चौकशीतुन सर्व सत्य बाहेर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
दंगलीत जात-धर्माचा समावेश नाही
कोणतीही दंगल असो ती वाईटच असते. त्यात जात-धर्माचा संबंध येत नाही. ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेऊन चौकशी केली जाईल. तसेच शिवसेना आणि एमआयएम पक्षीय वादातुन ही दंगल झालेली नसल्याचा दावाही रणजीत पाटील यांनी केला.
चौकशीचा कालावधी नाही
उच्चस्तरीय चौकशी किती दिवसात होणार? असा प्रश्न गृहराज्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगितले. तसेच मिटमिटा परिसरात झालेल्या दंगलीची चौकशी सुरू झालेली नाही याकडे लक्ष वेधताच त्यांनी त्या दंगलीचा आणि या दंगलीचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
जखमी, नुकसानीविषयी मंत्री अनभिज्ञ
दंगलीमध्ये नुकसान किती झाले? पोलीस अधिकारी, पोलीस आणि नागरिक किती जखमी झाले? याविषयीची आकडेवारी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारली असता,त्यांना ठोस आकडा सांगता आला नाही. आपल्या विभागातील किती पोलीस जखमी झाले. याचीही माहिती पाटील यांना देता आली नाही. दोन अधिकारी आणि तीन पोलीस जखमी झाल्याचे समजले, असे उत्तर दिले. तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच सर्व माहिती समोर येईल, असे सांगत वेळ मारून नेली.
...अन् पालकमंत्र्यांचा पारा चढला
शहरात पोलीस आयुक्त नाहीत, महापालिका आयुक्त नाही. यातच पाणी प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालकमंत्री असून नसल्यासारखेच आहेत, असा प्रश्न पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांना विचारला असता त्यांचा पारा एकदम चढला. पालकमंत्री असून नसल्यासारखे म्हणजे काय? पालकमंत्र्यांनी अशा घटना घडल्या त्यात काय करावे? शहरात दररोजच कचऱ्याची निर्मिती होते. त्यामुळे ती समस्या सोडविण्यासाठी थोडासा अवधी लागणार आहे. त्याविषयीचे नियोजन केले असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. घडलेली घटना दुर्दैवी आहे. समाजात सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणूनच शहरात आलो आहे. कोणत्याही समाजाला दंगली परवडत नसतात. दोन्ही बाजूकडील नागरिकांना शांतता, अमन हवी आहे. ती स्थापीत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.