औरंगाबाद हिंसाचाराची होणार उच्चस्तरीय चौकशी, 2 जणांचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 02:00 PM2018-05-23T14:00:43+5:302018-05-23T14:04:37+5:30
औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
औरंगाबाद - औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
11 मे व 12 मे रोजी औरंगाबादेत दोन गटांत हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेला गोळीबार आणि दगडफेकीत 200 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दंगलीत अनेकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सुमारे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले.
65 जणांविरोधात अटकेची कारवाई
या प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, कार्यकर्ता लच्छू पहिलवान उर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया, एमआयएमचा नगरसेवक फेरोज खान यांच्यासह आतापर्यंत 65 जणांना पोलिसांनी अटक केली आहेत. हिंसाचार घडवून आणणऱ्या अन्य लोकांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र पोलिसांकडून सुरूच आहे. दरम्यान सर्वपक्षीय मुस्लीम आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी रात्री भेटले. या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)बीपीन बिहारी हे करणार आहेत. दंगलीत नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. पोलीस दंगलीत पक्षपातीपणे वागल्याचा आरोप होत आहे. दंगलीत दोषी आढळलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.