औरंगाबादच्या बाजारात बाजरीला उच्चांकी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:31 PM2018-10-31T23:31:21+5:302018-10-31T23:32:14+5:30
एरव्ही १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या बाजरीला मंगळवारी ‘सोन्याचे दिवस’आले. एका शेतकºयाने आणलेल्या बाजरीला हर्राशीत चक्क २४७५ रुपये भाव मिळाला.
औरंगाबाद : एरव्ही १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या बाजरीला मंगळवारी ‘सोन्याचे दिवस’आले. एका शेतकºयाने आणलेल्या बाजरीला हर्राशीत चक्क २४७५ रुपये भाव मिळाला. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बाजरीला हा उच्चांकी दर मिळाला.
औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव येथील शेतकरी भरत हुलसार यांनी आज ८ गोण्या बाजरी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आणली होती. हर्राशीसाठी १० खरेदीदार आले होते.
२२०० रुपयांपासून बोली बोलण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता २४७५ रुपये प्रतिक्विंटल दर या बाजरीला मिळाला. आजपर्यंतचा सर्वाधिक भाव बाजरीला मिळाल्याची वार्ता कृउबामध्ये पसरली आणि ही बाजरी पाहण्यासाठी अन्य अडते व खरेदीदारांनी येथे गर्दी केली. जाड आणि हिरव्यागार दाण्याची ही बाजरी होती. आपल्या शेतातील बाजरीला आजपर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाल्याने भरत हुलसार आनंदित झाले. त्यांनी सांगितले की, कमी पावसात बाजरी हमखास येते. एक एकर बाजरी लावली होती.
दुष्काळाचा फटका यंदा बसला व २१ पोती बाजरी हाती आली. फुलोरा व खळाच्यावेळी पाऊस पडला नाही यामुळे बाजरी जाड व हिरवीगार झाली. मी आणलेल्या ८ गोण्या बाजरीला २४७५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
विहिरीतील पाणी आटले आहे, यामुळे रबीची शाश्वती नसल्याने शिल्लक बाजरी घरीच खाण्यासाठी ठेवली आहे.
विशेष म्हणजे, यंदा केंद्र सरकारने बाजरीला १९५० रुपये हमी भाव दिला आहे. दिवसभरात जाधववाडीत फक्त १६ क्विंटल बाजरीची आवक होऊन त्याला १८५० ते २४७५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. हमीभाव वाढला व विक्रमी भाव मिळाल्याने पुढील वर्षी बाजरी लागवडीकडे शेतकºयांचा कल वाढेल.
चौकट..
ज्वारीलाहीे विक्रमी ४२०० रुपये दर
मराठवाड्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. याशिवाय कर्नाटक राज्यातूनही ज्वारी बाजारात येत असते. मात्र, यंदा मराठवाडा भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे. पाण्याअभावी रबीत ज्वारीची पेरणी प्रभावित झाली आहे. कमी पेरणीमुळे पुढील ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. या परिस्थितीमुळे बाजारात ज्वारीचे भाव कडाडले आहेत. मागील महिनाभरात १००० ते १२०० रुपये क्विंटलने ज्वारी महागली आहे. जालना मिलमधून आज ८० पोते ज्वारी मोंढ्यात विक्रीला आली. या ज्वारीचा चक्क ४२०० रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला. या भावात विक्री होणारी ही थोडीच ज्वारी असली तरीही पहिल्यांदाच शाळू ज्वारीला उच्चांकी भाव मिळाला आहे, अशी माहिती होलसेल विक्रेते प्रशांत सोकिया यांनी दिली. दुसरे होलसेल विक्रेते नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, सध्या शाळू ज्वारी २६०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. कर्नाटकची ज्वारी मोंढ्यात येऊन २७०० ते ३००० रुपयांनी विकत आहे. २०१२-२०१३ मध्ये दुष्काळात ज्वारी तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्री झाली होती.
कोट...
परराज्यातील बाजरी पीक
राजस्थान व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक होत आहे. मात्र, तेथे काढणीच्या वेळेस पाऊस पडल्याने बाजरीचा रंग फिक्का पडला व दाणेही बारीक झाले आहेत. त्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात बाजरी हिरवीगार व जाड दाणे असल्याने भाव खाऊन जात आहे.
-मनीष शिरुरकर, अडत व्यापारी