चढ्या दराने बियाणे विक्री भोवली; पैठण तालुक्यातील ५ कृषीसेवा केंद्रांचे परवाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:25 PM2023-06-14T16:25:21+5:302023-06-14T16:25:54+5:30
कृषीखात्याच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने गैरमार्गाने व्यापार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.
पैठण: खते व बियाणांसाठी जास्तीची रक्कम शेतकऱ्याकडून उकळणाऱ्या तसेच अद्ययावत नोंदी न ठेवणाऱ्या पैठण तालुक्यातील पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने एक वर्षासाठी रद्द करण्यात आले आहे. कृषीखात्याच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीनंतर परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाट यांनी सांगितले.
कृषीखात्याच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने गैरमार्गाने व्यापार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे. तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रेते यांच्या गैरव्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर सहनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय अचानक तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे.
दरम्यान, तालुका सनियंत्रण कक्षात काही केंद्र चालक खते व बियाणे जास्तदरात विक्री करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी दाखल केल्या होत्या. सहनियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी ( दि.१३) तालुकास्तरीय व विभागस्तरीय पथकाने तालुक्यात पाचोड, विहामांडवा, आपेगाव व पैठण शहरातील दुकानांची तपासणी केली. तपासणीत पाचोड येथील श्रीराम कृषी सेवा केंद्र व विशाल कृषी सेवा केंद्र. विहामांडवा येथील अमृता एजन्सी व समर्थ ट्रेडर्स. पैठण शहरातील प्लांटेशन ऍग्रो सर्विसेस या कृषी केंद्रातून बियाणे जास्त दराने विक्री करत असल्याचे आढळून आले. रितसर पंचनामा व कारवाई करुन या दुकानांचे परवाने एक वर्ष कालावधीसाठी रद्द करण्यात आले.
पाचोड येथे कारवाई करणाऱ्या भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, कृषी पर्यवेक्षक संदीप जवणे, कृषी सहाय्यक प्रमोद रोकडे, कृषी सहाय्यक यशवंत चौधरी तर विहामांडवा पथकात जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक गणेश सर्कलवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री रामकृष्ण पाटील यांचा समावेश होता.