औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण
By बापू सोळुंके | Published: September 17, 2022 10:14 PM2022-09-17T22:14:09+5:302022-09-17T22:16:05+5:30
खळबळजनक घटना : छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात थरार
औरंगाबाद : कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निवृत्त सहसंचालकाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. १७) दुपारी बीड रोडवरील छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात घडली. अपहरणकर्त्यांनी सुमारे पावणेचार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजते. ही माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्यासह, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली तरी मध्यरात्रीपर्यंत त्यांना यश आले नव्हते.
विश्वनाथ राजळे (६२, रा. सिडको एन ७) असे अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजळे हे चार वर्षांपूर्वी एमआयडीसीतून निवृत्त झाले. त्यांनी इब्राहिमपूर शिवारात शेती घेतली व फार्म हाऊस बांधले. काही मित्रांसह त्यांनी तेथे गुळाच्या आधुनिक कारखान्याची उभारणी सुरू केली आहे. त्या साईडवर १० ते १५ मजूर काम करतात. १७ सप्टेंबरनिमित्त शनिवारी काम बंद असल्याने तेथे एकही मजूर नव्हता. सालगड्याचे कुटुंब तेथे होते. राजळे हे फार्महाऊसवर गेले तेव्हा सालगड्याची पत्नी कामासाठी जवळील शेतात गेली होती. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तेथे आलेल्या अनोळखी पाच ते सहाजणांनी राजळे यांना चाकूचा धाक दाखवीत बळजबरीने कारमध्ये बसविले. हे पाहून सालगड्याने आरडाओरड सुरू केली असता अपहरणकर्त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फार्महाऊसमध्ये कोंडले. यानंतर ते राजळे यांना सोबत घेऊन गेले.
सालगड्याच्या पत्नीने दार उघडले
अपहरणकर्त्यांनी फार्म हाऊसमध्ये कोंडलेला सालगडी आरडाओरड करीत होता. मात्र त्याचा आवाज ऐकण्यासाठी जवळ कोणीच नव्हते. काही वेळाने त्याची पत्नी तेथे आली तेव्हा पतीच्या ओरडण्याचा आवाज तिने ऐकला. शिवाय दाराला बाहेरून लावलेली कडी काढून ती आत गेली. यानंतर या घटनेची माहिती करमाड पोलिसांना आणि राजळे यांच्या नातेवाइकांना त्यांनी कळविली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सुमारे ३ कोटी ८० लाखांच्या खंडणीची चर्चा
अपहरणकर्त्यांनी राजळे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून राजळे यांना सोडण्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सूत्राने सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीही अपहरणकर्त्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडेही अपहरणकर्त्यांनी पैसेच मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय राजळे हे सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बोलणेही केल्याचे सूत्रांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात
हायप्रोफाईल अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि एलसीबी, करमाडच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.