हायप्रोफाईल सेक्स रॅकेट : वेश्याव्यवसाय करणाऱ्या २२ दलालांची नावे उघडकीस
By राम शिनगारे | Published: January 23, 2024 10:19 PM2024-01-23T22:19:25+5:302024-01-23T22:19:34+5:30
मुख्य आरोपीच्या बँक खात्यातील २८ लाख रु. गोठवले
छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कुख्यात आरोपीने वेश्याव्यवसायातून कमावलेले बँक खात्यातील २८ लाख २३ हजार ५८३ रुपये गोठवत दोन वाहनेही जप्त केली आहेत. दुसऱ्या छाप्यातील पाच आरोपींना न्यायालयाने तिसऱ्यांदा २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. त्याच वेळी वेश्याव्यवसायात अडकलेल्या शहरातील २२ दलालांची नावेही पोलिसांना चौकशीत मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने १३ जानेवारी रोजी एन-७ येथील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. त्यात मुख्य आरोपी संदीप पवार याच्यासह जागेच्या मालकाला अटक केली. तर एका महिलेला नोटिसीवर सोडले होते. त्यातील जागेच्या मालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुख्य आरोपी संदीप पवारला पोलिस कोठडी मिळाली. पवार याने कोठडीत दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वात सिडको पोलिसांनी १६ जानेवारीला बीड बायपासवरील सेनानगरात छापा मारून पोलिसांनी कुख्यात तुषार राजपूत, प्रवीण कुरकुटे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव, लोकेशकुमार केशमातो, अर्जुन भुवनेश्वर दांगे (दोघे रा. झारखंड) या पाच जणांना अटक केली.
त्यांच्या चौकशीतून पुण्याची कुख्यात दलाल लेडी डॉन कल्याणी देशपांडे हिचे नाव समोर आल्यावर २० जानेवारीला तिला अटक केली. ती ३० जानेवारीपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. दरम्यान, कुख्यात तुषार राजपूत याने पोलिसांची नजर चुकवून काही बँकेतील धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास अधिकारी गीता बागवडे यांनी उपायुक्त नवनीत कॉवत यांच्या सूचनेनुसार राजपूतच्या दोन बँकांतील खात्यांची चौकशी करून रक्कम गोठवली. आरोपींना न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.
पोलिस आणखी खोलात जाणार
सिडको पोलिसांनी वेश्याव्यवसायात नव्याने गुंतलेल्या संदीप पवारला अटक केली. त्यापासून पुण्यातील लेडी डॉन कल्याणीपर्यंत पोलिसांनी रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यात पहिल्यांदाच बँक खातीही गोठवली. सिडको पोलिस आणखी खोलात जाऊन तपास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.