शहरात हायप्रोफाईल स्पा, श्रीमंत कुटुंबातील आंटीने गरिबाघरच्या दोघींना जुंपले देहविक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:52 PM2021-12-10T19:52:37+5:302021-12-10T19:53:03+5:30
पोलिसांच्या धाडीत दोन पीडित महिला व आरोपी शेख फईम शेख हुसेन याच्यासह आंटीला अटक करण्यात आली
औरंगाबाद : उस्मानपुऱ्यातील सिटीचॉईस स्पाच्या नावाअडून सुरू असलेला हायप्रोफाईल कुंटणखाना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने उद्ध्वस्त केला. यात पकडलेल्या दोन पीडिता हलाखीच्या परिस्थितीने देहविक्रय करीत होत्या, तर आरोपी आंटी महिला श्रीमंत कुटुंबातील असल्याचे चौकशीत समोर आले. या आंटीने सुरुवातीला ब्युटीपार्लर टाकले. तेथून झालेली सुरुवात कुंटणखान्यापर्यंत येऊन ठेपली.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना मिळालेल्या माहितीनुसार, भाजीवालीबाई पुतळ्याजवळील स्पामध्ये वेशाव्यवसाय चालत होता. त्या कुंटणखान्यावर धाड टाकण्यासाठी उस्मानपुरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक शेळके यांनी डमी ग्राहक पाठवून ७ डिसेंबरला छापा मारला. त्यामध्ये दोन पीडित महिला व आरोपी शेख फईम शेख हुसेन याच्यासह आंटीला अटक करण्यात आली.
आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, देहविक्री करणाऱ्या नाशिक येथील महिलेला दोन मुले आहेत. तसेच दुसरी २२ वर्षीय तरुणी जालना जिल्ह्यातील आहे. ती परित्यक्ता असून एकटी राहते. घर चालविण्यासाठी दोघी या धंद्यात उतरल्या. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातील अर्धेअधिक पैसे आरोपी फईम शेख आणि आंटीच घेत होते. आंटी श्रीमंत घरातील असून, तिचे वडील सिंचन विभागात नोकरीला आहे. सुखवस्तु कुटुंबातील असताना फईमसोबतच्या संबंधांमुळे कुटुंबाला सोडून ती त्याच्यासोबत सुरुवातीला ब्युटी पार्लर, नंतर स्पा आणि त्यामध्ये वेश्याव्यवसायात आली.
आरोपीकडे कासवं?
गुन्हे शाखा व पोलिसांनी पकडलेला आरोपी फईम शेख याच्याकडे दोन कासव सापडल्याची चर्चाही होती. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. तपास अधिकारी निरीक्षक बागवडे यांनीही घटनास्थळी कासव मिळाले नसल्याचे सांगितले.