औरंगाबाद-अंकई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘हाय स्पीड’; फायनल लोकेशन सर्व्हेला मिळाली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 12:32 PM2022-02-04T12:32:03+5:302022-02-04T12:33:53+5:30
अर्थसंकल्पात मराठवाड्याची मात्र निराशाच, केवळ १.४२ टक्के निधी, पीटलाइनचा प्रश्न कायम
औरंगाबाद : यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद-अंकई (मनमाड) या ९८ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंल्पातून मराठवाड्यातील रेंगाळलेल्या रेल्वे प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु ‘दमरे’च्या नांदेड विभागावर नेहमीप्रमाणे अन्याय झाल्याचीच भावना प्रवासी संघटनांतून व्यक्त होत आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेला ९ हजार १२५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड या २९१ कि. मी. अंतर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे; मात्र त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला ग्रीन सिग्न देण्यात आला आहे. त्यामुळे किमान आता औरंगाबाद-अंकईपर्यंत रेल्वे प्रवास करण्यासाठी लवकरच दुहेरी मार्ग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबादेतील चिकलठाणा येथे पीटलाइन होणार की नाही, हे मात्र अर्थसंकल्पातून स्पष्ट होऊ शकले नाही.
४ महिन्यांत सर्वेक्षण होणार पूर्ण
आगामी ४ महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर डीपीआर रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येईल, अशी माहिती गुरुवारी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांना ऑनलाइन माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना दिली. अर्थसंकल्पात औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी अवघ्या १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही; मात्र अंब्रेला वर्कच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर सोयी-सुविधा दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. नांदेड विभागाच्या संबंधित प्रश्नांवर उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले.
विभागाला अल्प निधी
नांदेड विभागाला केवळ १.४५ टक्के निधी देण्यात आला. पीटलाइनविषयी काही निर्णय झालेला नाही. मात्र रेल्वे मार्गाच्या नूतनीकरणासाठी यंदा अधिक निधी देण्यात आला, ही दिलासादायक बाब आहे.
-स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक
नांदेड विभागाला मिळाले काय?
-अकोला-धोनदरम्यान दुहेरीकरण मंजूर
- मनमाड-मुदखेड-धोन रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी २२९ कोटी.
-पिंपळकुटी-मुदखेड आणि परभणी-परळी वैजनाथ मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १२९ कोटी.
- परळी वैजनाथ-विकाराबाद मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १०९ कोटी.
- पूर्णा-अकोला मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १०३ कोटी.
- अकोला-खंडवा-महू-रतलाम दरम्यान गेज परिवर्तन प्रकल्पासाठी ८८८ कोटी.