औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 11:41 AM2021-08-20T11:41:07+5:302021-08-20T11:47:43+5:30
Diksha Shinde 's Selection on NASA's : नासाकडील संशोधन प्रकल्पांची तपासणी करून त्यात सूचना करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे.
औरंगाबाद : दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदेची नासा (NASA ) या जगप्रसिद्ध या अमेरिकन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या पुस्तकामुळे संशोधनपर लेखनाची प्रेरणा मिळालेल्या आयसीएसई बाेर्डात शिकणाऱ्या दीक्षाला तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळाले आहे. दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हे देवाच्या अस्तित्वासंबंधीचा लेख नासाला पाठवला होता. ज्यात तिने देव नाही असा निष्कर्ष मांडला. ( The high spirits of Aurangabad's Diksha Shinde ; Selected on NASA Fellowship Panel )
अॅस्ट्रोफिजिक्स विषयात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न असलेल्या दीक्षाने सांगितले की, मी नासाचे (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) संकेतस्थळ रोज पाहत होते. नवनवीन माहिती वाचत होते. मला स्टीफन्स हॉकिंग यांची पुस्तके वाचण्याची आवड आहे. नासाच्या या संकेतस्थळावर मी प्रथम जून २०२० मध्ये संशोधनपर लेख पाठवला. तो नाकारण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नातही यश आले नाही. पण निराश झाले नाही. हार मानली नाही. यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करण्याचा माझा स्वभाव आहे. कुटुंबीयांनी मला यात खूप साथ दिली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये तिसऱ्या प्रयत्नात निवड झाली. नासाकडील संशोधन प्रकल्पांची तपासणी करून त्यात सूचना करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परिषदेसाठी निमंत्रण
दीक्षाचे वडील कृष्णा शिंदे केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथील केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक, तर आई रंजना गृहिणी आहेत. कृष्णा शिंदे म्हणाले की, ‘नासाच्या आर्टिकलसाठी तिने खूप मेहनत घेतली. दोनदा अपयश आल्यावरही हार मानली नाही, तिची मेहनत आणि स्वप्नांना आमचा कायम पाठिंबा आहे.’ ऑक्टोबरमध्ये आयोजित जागतिक परिषदेसाठी नासातर्फे दीक्षाला निमंत्रण आले आहे. मात्र, तिने परिषदेत ऑनलाइन सहभागी होण्याचे ठरवले आहे. नासाच्या पॅनलिस्टसोबत माझ्या ऑनलाइन मीटिंग होतात. ''सुरुवातीला मी नेमके काय करते आहे, हे पालकांना माहितीच नव्हते. वेगवेगळी प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळायला लागली. तेव्हा काही फसवणूक तर नाही न असे वाटत होते. परंतु, वास्तव कळाल्यावर आईवडील प्रचंड खुश झाले. पॅनलिस्ट म्हणून सहा महिन्यांसाठी नियुक्ती असून ५० हजार रुपये मानधन मिळणार आहे'', असे दीक्षाने सांगितले.