विद्यापीठ : प्राध्यापक भरतीच्या वादात उच्च शिक्षण संचालकांची उडी
By राम शिनगारे | Published: September 4, 2023 09:02 PM2023-09-04T21:02:28+5:302023-09-04T21:02:39+5:30
संघटनांच्या तक्रारीच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या ७३ प्राध्यापकांच्या भरतीच्या वादात प्रभारी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी उडी घेतली आहे. विद्यापीठ विकास मंचसह इतर संघटनांनी पदभरती संदर्भात दिलेल्या निवेदनानुसार चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची स्थापन केल्याचे आदेश डॉ. देवळाणकर यांनी दिले आहेत.
विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या स्थगितीची मागणी सत्ताधारी भाजपशी संबंधित विद्यापीठ विकास मंचचे पदाधिकारी, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डाॅ. गजानन सानप यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्याशिवाय महाराष्ट्र ऑल बहुजन टीचर्स असोसिएशन, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांच्याकडे भरतीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींच्या चौकशीसाठी मुंबई विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे आणि नागपूर येथील विज्ञान संस्थाचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांची द्विसदस्यीय समिती डॉ. देवळाणकर यांनी स्थापन केली. ही समिती महिनाभरात आपला अहवाल संचालकांना देणार आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध प्राध्यापक संघटनांनी औरंगाबाद विभागाचे सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर आणि प्रशासन अधिकारी वनिता सांजेकर यांच्याही चौकशीचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्या दोघांची चौकशीही डॉ. तुपे यांनीच केली. महिनाभरात अहवाल सादर केला जाणार होता. मात्र, त्या चौकशीचे पुढे काय झाले, याविषयी अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.
सगळीकडे तुपेंचीच वर्णी
प्रभारी उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर हे औरंगाबाद विभागात कोणताही प्रकार घडल्यानंतर त्याविषयी चौकशीसाठी डॉ. केशव तुपे यांचीच चौकशी समिती नेमतात. या चौकशी समितीचे पुढे काय होते याविषयीची माहिती कोणालाही मिळत नाही. सहसंचालक डॉ. ठाकूर, प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्या चौकशा झाल्या. पण, पुढे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर आता विद्यापीठाच्या भरती प्रकरणातही तुपे यांचीच चौकशी समिती नेमली आहे. सगळीकडे तुपेंचीच वर्णी कशी असते अशी चर्चा सुरू झाली आहे.