कुलगुरू चोपडे यांची होणार उच्चस्तरीय चौकशी; उच्च शिक्षणमंत्री तावडे यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:19 PM2018-03-28T13:19:13+5:302018-03-28T15:27:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती यांनी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे तसेच शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती यांनी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे तसेच शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची चौकशी समिती नेमण्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत केली. या चौकशीचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.
विद्यापीठात शासकीय कामकाज विद्यापीठ कायद्यानुसार होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींनी केल्या होत्या. याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळानेही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत कुलगुरूंनी केलेल्या अनियमिततेविषी निवेदन दिले होते. यानंतर आ. चव्हाण यांनी विधानपरिषदेत नियम २६० अन्वये झालेल्या चर्चेत विद्यापीठाचा कारभार आणि कुलगुरूंच्या आर्थिक भ्रष्टाचारांची मुद्देसुद मांडणी केली होती.
या चर्चेला विनोद तावडे यांनी बुधवारी उत्तर दिले. यात त्यांनी राज्यपालाच्या आदेशाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ़ पाटील यांची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. यात डॉ. इतरही शासकीय अधिकाºयाचा समावेश करणार असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले. ही समिती दोन महिन्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्यपालांना सादर करेल, असेही तावडे यांनी सांगितले. विधानपरिषदेत तावडे यांनी घोषणा केल्यानंतर तात्काळ याविषयीचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. या शासन निर्णयात विविध समितीच्या कामकाजाविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.