उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:06 AM2021-02-11T04:06:31+5:302021-02-11T04:06:31+5:30
विद्यार्थ्यांना फटका : एमसीव्हीसीचा अभ्यासक्रम सुरू राहावा शिक्षक, संस्थाचालकांची मागणी योगेश पायघन औरंगाबाद : केंद्र सरकारने अनुदान देणे बंद ...
विद्यार्थ्यांना फटका : एमसीव्हीसीचा अभ्यासक्रम सुरू राहावा शिक्षक, संस्थाचालकांची मागणी
योगेश पायघन
औरंगाबाद : केंद्र सरकारने अनुदान देणे बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या शासकीय तंत्र माध्यमिक संस्था बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम आता आयटीआयमध्ये विलीन केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या रूपांतरणाला विरोध केला आहे.
जिल्ह्यात शासकीय तंत्र माध्यमिक ३ संस्था आहेत, तर शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात एक प्रशिक्षण केंद्र आहे. याशिवाय जिल्ह्यात अनुदानित २६, तर कायम विनाअनुदानित १७५ संस्था आहेत. यात १७ हजार ६०० विद्यार्थी क्षमता असून, यावर्षी ४,५०० विद्यार्थी प्रवेशित आहेत. एसएससी व्होकेशनल अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यातून काैशल्य मिळवून उच्चशिक्षणाकडे जाणारा वर्ग कमी असून, केंद्राने बंद केलेल्या अनुदानामुळे हे अभ्यासक्रम आयटीआयमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याचा सर्वाधिक फटका शिक्षकांसह संस्थाचालकांना बसणार असल्याचे व्होकेशनल टीचर्स असोसिएशनने म्हटले आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार असल्याच त्यांचे म्हणणे आहे.
---
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील संस्था
शासकीय- ४
अनुदानित- २६
कायम विनाअनुदानित- १७५
प्रवेश क्षमता- १७,६००
सध्या प्रवेश- ४,५००
---
विद्यार्थी आणि शिक्षकांवर अन्यायकारक
एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) अभ्यासक्रमक १९८८ पासून सुरू करण्यात आले. गरीब वंचित विद्यार्थ्यांना काैशल्य देऊन त्यांना रोजगार मिळावा. हे ध्येय होते. ते ९० टक्के पूर्ण झाले. या निर्णयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी वंचित होतील. शिकाऊ उमेदवारीअंतर्गत अनेक जण नोकरीला लागले. त्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक निर्णय आहे, तर या अभ्यासक्रमासाठी असलेल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आणणारा हा निर्णय आहे, असे डाॅ. वानखेडे म्हणाले.
एमसीव्हीसीपेक्षा आयटीआयला जास्त मागणी
आयटीआयची प्रवेश क्षमता वाढेल, एमसीव्हीसीपेक्षा आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जास्त मागणी आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, वैजापूर येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, केंद्रातील अभ्यासक्रम तेथील आयटीआयमध्ये रूपांतरित होतील. यामुळे त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश क्षमता वाढेल.
-जी.बी. दंदे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी
कोर्सला नोकरीची जोड हवी
एमसीव्हीसी कोर्स व्यावसायिक अभ्यासक्रम असला तरी या अभ्यासक्रमाने मला नोकरी दिली. नोकरी करून पुढचे शिक्षण केले. आता संगणक शिक्षक म्हणून सध्या एका महाविद्यालयावर पाच वर्षांपासून नोकरी करतो. अनेक विद्यार्थ्यांना लगेच नोकरी मिळून देणारा अभ्यासक्रम शासनाने बंद करण्याएवजी या कोर्सला नोकरीची जोड द्यायला हवी होती. गरजू विद्यार्थ्यांचे या निर्णयाने नुकसान होईल.
-प्रा. संतोष खाटीक, माजी विद्यार्थी
हा अन्याय आहे
यासंदर्भात शासनाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल यायचा आहे. त्याआधीच शासन निर्णय एचएससी व्होकेशनल विभागाचे शिक्षक शिल्पनिदेशक म्हणून समायोजन केले. हा अन्याय आहे. त्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधा वाढविण्याऐवजी हा अन्यायकारक निर्णय घेतला आहे, तर संस्थाचालकांनी हा अभ्यासक्रम मेहनतीने चालवला. त्यांचे यामुळे नुकसान होणार आहे.
-डाॅ. मनोहर वानखेडे, राज्य सहसचिव, महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन
चांगले कोर्स बंद पडतील
प्रत्येक कोर्सला आवश्यक साहित्य खरेदी करून संस्थांनी ते प्रशिक्षण दिले. शासकीय संस्थांचा निर्णय झाला म्हणजे तो आता अनुदानित, विनाअनुदानित संस्थांचाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगले कोर्स बंद पडतील. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकताना कौशल्य आत्मसात करत होते. त्यांना आता एकतर कौशल्य किंवा शिक्षण निवडावे लागले. याशिवाय शिक्षक आणि संस्थांचे या निर्णयामुळे नुकसानच होणार आहे.
-डाॅ. किरण एखंडे, संस्थाचालक, बिडकीन