टँकरवर सर्वांधिक १७ कोटी खर्च
By Admin | Published: September 7, 2014 12:35 AM2014-09-07T00:35:45+5:302014-09-07T00:41:53+5:30
औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला.
औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. एप्रिलपासून आॅगस्टअखेरपर्यंत म्हणजे गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात टँकर आणि विहीर अधिग्रहणासह इतर उपाययोजनांवर तब्बल १९ कोटी ६९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १७ कोटी रुपये टँकरवर खर्च झाले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यास यंदा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. जानेवारी महिन्यापासून अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. याशिवाय ठिकठिकाणी विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. तसेच नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर, तात्पुरती पूरक नळ योजना राबविणे आदी उपाययोजनाही केल्या जात होत्या.
मार्चपासून टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या सातत्याने वाढत गेली. जुलैमध्ये जिल्ह्यात अडीचशे गावांना तब्बल ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय साडेतीनशे गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. मात्र, आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सलग चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याचे आटलेले स्रोत पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद झाले. एकट्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर ७ कोटी रुपयांचा खर्च झाला. तर एप्रिलपासून ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात टंचाई निवारणावर १९ कोटी ६९ लाख रुपये खर्च झाले आहेत.