उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:41 AM2022-09-19T11:41:39+5:302022-09-19T11:42:18+5:30
महारोजगार मेळाव्यात १५३२ जणांना रोजगार, १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड
औरंगाबाद : कोणी इंजिनिअर्स, तर कोणी पदव्युत्तर पदवी धारण केलेले, एवढेच काय; सध्या नोकरीत असलेलेही बेरोजगारांच्या रांगेत उभे. ही परिस्थिती पाहायला मिळाली आयटीआय येथील महारोजगार मेळाव्यात.
चांगली नोकरी मिळेल, या आशेने औरंगाबादच नव्हे, तर इतर जिल्ह्यातील युवक-युवतींनीही हा मेळावा गाठला होता. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशीही रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांत १५३२ जणांना रोजगार मिळाला, तर १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड झाली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, ॲप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचा रविवारी समारोप झाला.
शिकाऊ उमेदवारांची स्थिती
विविध ६८ कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत ३ हजार २० ॲप्रेंटिसशिपची पदे होती. यासाठी २ हजार ८७५ उमेदवारांनी नोंदणी केली. पैकी १,१९६ पात्र उमेदवारांची निवड झाली. या व्यतिरिक्त मेळाव्यात बारावी व्होकेशनल (किमान कौशल्य) शिक्षण घेतलेल्या २७३ उमेदवारांची २२ विविध कंपन्यांत निवड झाली, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी दिली.
रोजगारातील परिस्थिती
दोन दिवसांत ३५१४ जणांच्या मुलाखती झाल्या. यात १,२५९ जणांची प्राथमिक निवड झाली, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. आर. वराडे यांनी सांगितले.
काहींना फक्त आश्वासन
मेळाव्यात एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. एकूण ६३८९ जणांनी नोंदणी केली. त्यात २७२८ जणांची निवड झाली. नंतर काॅल करू, असे सांगून पाठविण्यात आल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
एकाच जागी अनेक संधी
या मेळाव्याच्या माध्यमातून एकाच जागी विविध कंपन्या आल्या. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. दोन कंपन्यांकडे अर्ज केला आहे.
- विद्या छापरवाल
सध्या जाॅब सुरू, पण..
मेळाव्यासाठी सिल्लोडहून आलो. यापूर्वी येथेच झालेल्या मेळाव्यात ॲप्रेंटिससाठी निवड झाली होती. अधिक वेतनाचा जाॅब मिळेल, या दृष्टीने आलो आहे.
- अजिनाथ पडूळ
कुटुंबाची जबाबदारी
माझे एम. काॅम झालेले आहे. सध्याही जाॅब सुरू आहे. मात्र, कमी वेतन आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे चांगल्या वेतनाची नोकरी मिळेल, यासाठी आले.
- अर्चना बुबने