भाविकांच्या गर्दीने महामार्ग फुलला
By Admin | Published: October 25, 2015 11:52 PM2015-10-25T23:52:32+5:302015-10-26T00:01:27+5:30
तामलवाडी : कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने तुळजापूर-सोलापूर महामार्ग फुलून गेल्याचे रविवारी दिसून आले.
तामलवाडी : कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने तुळजापूर-सोलापूर महामार्ग फुलून गेल्याचे रविवारी दिसून आले. ‘आई राजा उदो उदोऽऽ’ चा जयघोष करीत तुळजाभवानीच्या दर्शनाची आस मनात ठेवून निघालेल्या या भाविकांच्या सोईसाठी विविध संस्था, संघटनांनी रस्त्यावर स्वागताचे फलक लावून त्यांच्या चहा-पान व अन्नदानाचीही सोय केली आहे.
सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे रविवारपासूनच आंध्र, कर्नाटकातील भाविक सोलापूर येथून तुळजापूरकडे पायी दाखल होत आहेत. डोक्यावर उन्हाचे चटके घेत निघालेले हे भाविक थकवा आल्यानंतर मिळेल त्या जागेवर विसाव्याला थांबत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हजारो भाविक तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले. महामार्गावर तामलवाडी शिवारात बालाजी अमाईन्स कारखान्याच्या वतीने तसेच सोलापूर येथील युवा क्लबच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच रविवारी भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीसही बंदी करण्यात आली असून, सर्व वाहतूक ईटकळ मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता पूर्णपणे खुला झाला आहे.
दरम्यान, महामार्ग रूंदीकरणासाठी रस्त्यालगतची सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे डोक्यावर उन्हाचे चटके घेत निघालेल्या भाविकांना रस्त्यात सावलीला थांबायचे म्हटले तरी कुठे जागा नसल्याचे दिसते. कर्नाटकातील काही भाविकांनी तामलवाडी पोलिस ठाणे आवारात विसावा घेतल्याचे तर अनेक भाविक महामार्गालगत असलेल्या शेतात जावून विश्रांती घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, तामलवाडी साठवण तलावातील पाणी सध्या सुरतगाव शिवारात आले असून, या पाण्यात स्रान करण्यासाठीही भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)