महामार्गाची ‘सावली’ हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:12 AM2017-11-18T00:12:49+5:302017-11-18T00:12:52+5:30

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील हजारो झाडांची रुंदीकरणाच्या नावाखाली सध्या युद्धपातळीवर कत्तल सुरु असल्याने महामार्ग बोडखा दिसू लागला आहे. अनेक जुनी झाडे तुटल्याने महामार्गावरील प्रवाशांची सावली हरवली आहे.

 Highway 'shadow' | महामार्गाची ‘सावली’ हरपली

महामार्गाची ‘सावली’ हरपली

googlenewsNext

रऊफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील हजारो झाडांची रुंदीकरणाच्या नावाखाली सध्या युद्धपातळीवर कत्तल सुरु असल्याने महामार्ग बोडखा दिसू लागला आहे. अनेक जुनी झाडे तुटल्याने महामार्गावरील प्रवाशांची सावली हरवली आहे.
औरंगाबाद -जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत अजून ठोस माहिती जनतेपर्यंत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. काम सुरु करण्यापूर्वी आहे त्या झाडांची तोड जोरात सुरु आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या कामकाजाबाबत जनतेपर्यंत खरी माहिती द्यावी, अशी मागणी वृक्षतोड पाहून जनता करु लागली आहे. अनेकांनी वृक्षतोडीस विरोधही दर्शविला असून वृक्षतोडीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही होऊ लागली आहे.
वन विभागाच्या वतीने १ ते ७ जुलै २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करीत असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला. सर्वत्र वृक्ष लागवड करण्यात आली पण प्रत्यक्षात ५० टक्केही झाडे जगली नाही. सरकार एकीकडे झाडे लावा असा संदेश देत असताना दुसरीकडे रस्ता रुंदीकरण करताना ५० ते ६० वर्षांची जुनी झाडे तोडली जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा असमतोल वाढत असल्याचे चित्र आहे.
पोरके झालो आम्ही, पोरकी माती
औरंगाबाद -जळगाव महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यात दुचाकींची संख्या जास्त असते. त्यांना उन्हाळ्यात विसावा घेण्यासाठी या झाडाचा आधार घ्यावा लागतो, तर पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी हीच झाडे आश्रय देतात. पण आजच्या घडीला या रस्त्यावर आता कुठेही थांबता येणार नाही. लांब अंतरापर्यंत झाडे तोडण्यात आलेली आहेत. रस्ता झाडाविना पोरका झाला आहे. आता नवीन झाडे लावण्यात आली तरी किमान दहा वर्षांनी त्यांची सावली मिळू शकते.
एकंदरीत आजच्या परिस्थितीवरुन ‘भग्नावस्थेत आहे महामार्ग, वृक्षवल्ली खुणावते आहे, पोरके झालो आम्ही, पोरकी झाली माती’ या काव्यपंक्ती आठवल्याशिवाय राहवत नाही.

Web Title:  Highway 'shadow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.