हिंदू जन गर्जना मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली; संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम
By बापू सोळुंके | Published: March 18, 2023 11:31 PM2023-03-18T23:31:29+5:302023-03-18T23:37:42+5:30
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर: सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्यावतीने उद्या रविवारी आयोजित केलेला समर्थन मोर्चाला पोलीस प्रशासनाने रविवारी रात्री परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा होणार असल्याचे संयोजकांनी लोकमतला सांगितले.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाचा हिंदू समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा अभिनंदन करण्यासाठी तसेच छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ उद्या रविवारी सकल हिंदू एकत्रित समितीच्यावतीने क्रांती चौक इथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . क्रांती चौक ते पैठण गेट, टिळकपथ मार्गे औरंगपुऱ्यातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे.
या मोर्चासाठी परवानगी मिळावी संयोजकांनी 16 मार्च रोजी पोलीस प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याची पत्र आयोजकांना दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी ठरल्याप्रमाणे मोर्चा काढला जाणार असल्याचे आयोजकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच नसल्याचे मोर्चाच्या संयोजकांनी स्पष्ट केले